नाशिककरांना रस्त्यांच्या खोदकामांचा आणखी चार वर्षे मनस्ताप

Smart nashik www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरासह उपनगरांमध्ये महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून (एमएनजीएल) घरोघरी गॅस पोहोचवण्यासाठी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असून, ठिकठिकाणी रस्ते खोदले आहेत. चिंतेची बाब म्हणजे सद्यस्थितीत कंपनीचे अवघे 10 टक्के काम झाले असून, उर्वरित 90 टक्के काम पूर्ण करण्यासाठी पुढील चार वर्षे रस्ते तोडफोडीचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे पुढील काळातही नाशिककरांना खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागणार आहे. घरोघरी गॅसचे स्वप्न दाखवत एमएनजीएल कंपनीकडून पाइपलाइन टाकण्यासाठी शहरात ठिकठिकाणी रस्ते खोदण्याचे काम जोरात सुरू आहे. अगदी नवेकोरे सिमेंट काँक्रीटचे रस्ते फोडले जात आहेत. सर्व नियम धाब्यावर बसवत कटरऐवजी पोकलॅण्डने रस्ता उखडला जात आहे. त्यामुळे नाशिककरांमध्ये रोष असून, महापालिकेने या कंपनीला दंडही ठोठावला आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी 250 किमीचे रस्ते खोदले गेले आहेत. अद्याप मुख्य रस्ते व चौक या ठिकाणीच हे खोदकाम सुरू असून, एकूण कामाच्या 10 टक्केच काम पूर्ण झाले आहे. अजून गल्लीबोळात व घरोघरी गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी दोन हजार किलोमीटर रस्ते खोदावे लागणार आहेत. पाइपलाइन टाकण्याचे उर्वरित 90 टक्के काम पूर्ण करण्यासाठी चार ते पाच वर्षे लागतील. या कालावधीत महापालिकेकडून टप्प्याटप्प्यात परवानगी घेत रस्ते खोदकाम केले जाईल.

180 कोटींपैकी 60 कोटी
रस्ते फोडण्याच्या मोबदल्यात एमएनजीएलकडून अपेक्षित असलेली 60 ते 180 कोटींची रक्कम भरणे अपेक्षित होते. मात्र, केवळ 55 ते 60 कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाला फोडलेले रस्ते दुरुस्ती व डागडुजीचे काम पूर्ण क्षमतेने करता येत नसून ठेकेदारांचे बिलही अडकले आहे.

हेही वाचा:

 

The post नाशिककरांना रस्त्यांच्या खोदकामांचा आणखी चार वर्षे मनस्ताप appeared first on पुढारी.