नाशिकची अष्टपैलू प्रचिती भवर महाराष्ट्र क्रिकेट संघात

प्रचिती भवर www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकच्या प्रचिती सतीश भवरची १५ वर्षांखालील महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे झारखंड, रांची येथे १५ वर्षांखालील महिलांसाठी ५० षटकांची एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, त्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघात प्रचितीची निवड झाली आहे.

उजव्या हाताने फलंदाजी करणारी प्रचिती ही अष्टपैलू खेळाडू असून, ती ऑफ स्पिन गोलंदाजी करते. प्रचितीच्या या निवडीमुळे सध्या महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या पुरुष व महिलांच्या सर्वच वयोगटांत नाशिकच्या क्रिकेटपटूंचे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांत प्रतिनिधित्व वाढले आहे. प्रचितीच्या निवडीमुळे नाशिकमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. पंचवटीतील हनुमानवाडी येथे राहणारी प्रचिती ही एका सर्वसामान्य कुटुंबातील असून, लहानपणापासूनच असलेल्या क्रिकेटच्या आवडीमुळे तिने मोठ्या जिद्दीने महाराष्ट्र संघात स्थान मिळविले आहे. प्रचिती भवर हिला प्रशिक्षक भावना गवळी यांचे प्रशिक्षण लाभले आहे. तिच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, १५ वर्षांखालील महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेचे साखळी सामने दि. २६ डिसेंबर ते ३ जानेवारीदरम्यान रांची येथे खेळविले जाणार आहेत.

महाराष्ट्राचे सामने पुढीलप्रमाणे : वडोदरा – २८ डिसेंबर, हरियाणा – ३० डिसेंबर, पुद्दुचेरी – १ जानेवारी व छत्तीसगड – ३ जानेवारी.

हेही वाचा :

The post नाशिकची अष्टपैलू प्रचिती भवर महाराष्ट्र क्रिकेट संघात appeared first on पुढारी.