नाशिकच्या काळाराम मंदिरात १ जानेवारीला रंगणार ‘अष्टौप्रहर स्वरहोत्र

नाशिक पंचवटी,www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
श्री काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने रविवारी (दि. १) भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेनुसार संपूर्ण दिवसाच्या २४ तासांतील आठ प्रहरांत विविध थाटावर आधारित रागांची स्वरसाधना करण्यासाठी अष्टौप्रहर स्वरहोत्र या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शास्त्रीय गायन, वादन आणि कथक नृत्यक्षेत्रातील नामवंत कलाकार आपापली कला सादर करणार आहेत. पहाटे ५.३० पासून या स्वरहोत्राला प्रारंभ होणार आहे.

‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाचे प्रवर्तक विनायक रानडे यांची या कार्यक्रमाची संकल्पना असून, संयोजन श्री काळाराम संस्थानचे विश्वस्त ॲड. दत्तप्रसाद (अजय) निकम करणार आहेत. तर निमंत्रक संस्थानचे अध्यक्ष व जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ. उमेशचंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व विश्वस्त धनंजय पुजारी, मंदार जानोरकर व शुभम मंत्री तसेच समन्वयक म्हणून सी. एल. कुलकर्णी, एन. सी. देशपांडे, समीर देशपांडे, मित्र जीवाचे फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश भोरे मोलाचे काम करत आहेत.

पंचवटीतील प्राचीन काळापासून असलेल्या श्री काळाराम मंदिरात रविवारी पहाटे ५.३० पासून ते मध्यरात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. उपक्रमाला मैत्र जीवाचे फाउंडेशनचे अविनाश बोडके, महेश महंकाळे, सुनील बोरसे, सचिन कोळपकर व अन्य विश्वस्त यांचे सहकार्य लाभले असून, कार्यक्रमात नाशिकमधील दिग्गज गायक, कलाकार, सृजन, रसिक आणि भक्त यांची मांदियाळी असणार आहे. या सृजनांचे प्रयोजन, संकल्पन, आरेखन, नियोजन आणि निवेदन सोबतीला काळाराम संस्थानचे आयोजन आणि नाशिकमधील समस्त कलाकारांचे समर्पण या त्रिवेणी संगमातून नाशिक शहरात एक नवीन कला संस्कृती रुजू होत आहे. कार्यक्रमाचे समन्वयक सी. एल. कुलकर्णी, समीर देशपांडे, गणेश भोरे हे आहेत, तर या कार्यक्रमासाठी विविध संस्था संघटनांचेही सहकार्य लाभले आहे.
चौकट

५२५ जणांचा समूह कार्यरत

विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या आयोजनात १५ दिवसांपासून शहरातील सुमारे १२५ कलाकार, १०० स्वयंसेवक, ३०० महिला आणि संगीत शिकणारे विद्यार्थी कार्यरत आहेत. सर्वच कलाकारांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला असून, तयारीत गुंतले आहेत. सोबतच अनेक दानशूर व्यक्तींनी यात आपापल्या परीने या कलाकारांच्या मदतीसाठी विविध सेवा पुरवण्याची जबाबदारी उचलली आहे. अशा अभूतपूर्व एकत्रित आणि आश्वासक सेवाकार्याचे साक्षीदार होण्याची संधी नाशिककरांना लाभणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमास सर्व नाशिककरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिकच्या काळाराम मंदिरात १ जानेवारीला रंगणार 'अष्टौप्रहर स्वरहोत्र appeared first on पुढारी.