नाशिकमध्ये प्रथमच ई-कचरा संकलनासाठी मोहीम

ई- कचरा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे निर्माण होणारा ई-कचरा आज सर्वांचीच डोकेदुखी ठरत आहे. यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत अनेक प्रश्न असून, त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये ई-कचरा संकलन करण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. येत्या २४, २५ आणि २६ या तीन दिवसांच्या कालावधीत ई-कचरा संकलन केले जाणार आहे.

आजच्या टेक्नोसॅव्ही जगात, तंत्रज्ञानाची कास धरून आपण चुटकीसरशी कार्यालयीन, शैक्षणिक आणि वैयक्तिक कामे पार पाडत आहोत. यामुळे इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल आणि स्मार्ट गॅझेट्सचा वापर आणि खप प्रचंड प्रमाणात वाढला असून, त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक वेस्ट अर्थात ई-कचरा अखंडपणे निर्माण होत आहे. मात्र पर्यावरणपूरक पद्धतीने त्याची विल्हेवाट लागत नसल्याचे चित्र आज सर्वत्र दिसून येते. अवैज्ञानिक पद्धतींनी ई-कचऱ्याची हाताळणी केल्याने हवा, पाणी आणि मातीचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे मानवी आणि पर्यावरणीय आरोग्यावर परिणाम होत आहे. त्या अनुषंगाने येत्या प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून कॉम्प्युटर सोसायटी आॅफ इंडिया (सीएसटी) नाशिक शाखा, पूर्णम इकोव्हिजन पुणे आणि पर्यावरण संरक्षण ग्रुप यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ‘ई-यंत्र’ ही ई-कचरा संकलन मोहीम राबविण्यात येत आहे. नाशिकमधील सर्व औद्योगिक संस्था, शैक्षणिक संस्था, रहिवासी सोसायटी यांना पुढे येऊन “ई-कचरा संकलन केंद्र” म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आपल्या कार्यालयातील, संस्थेतील आणि घरातील ई-कचरा, २४, २५ आणि २६ जानेवारी या तीन दिवसांमध्ये आपल्या जवळच्या ई-कचरा संकलन केंद्रावर नेऊन देण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

नाशिकमध्ये प्रथमच अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक मोठ्या औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे. या मोहिमेचा शुभारंभ, राष्ट्रीय युवा दिन अर्थात स्वामी विवेकानंद जयंतीदिनी दि. १२ जानेवारी रोजी नाशिक फर्स्ट, ट्रॅफिक एज्युकेशन पार्क, मुंबई नाका येथे सायंकाळी ५. ३० वाजता संपन्न होत आहे. याप्रसंगी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये प्रथमच ई-कचरा संकलनासाठी मोहीम appeared first on पुढारी.