नाशिकमध्ये मतदान यंत्रांची तपासणी सुरू, भेल कंपनीची टीम दाखल

godown www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सय्यद पिंप्री येथील जिल्हा निवडणूक शाखेच्या गोदामामध्ये मंगळवार (दि.४) पासून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स‌ची पहिल्या स्तरावरील (फर्स्ट लेव्हल चेकिंग) तपासणीला सुरुवात झाली आहे. बंगळुरू येथील भेल कंपनीच्या आठ तंत्रज्ञांची टीम ही तपासणी करत असून, महिनाभर ही प्रक्रिया चालणार आहे.

अवघ्या आठ महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी आतापासूनच शड्डू ठाेकले आहेत. त्याचवेळी प्रशासनानेही त्यांच्या पातळीवर निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. गेल्या महिन्यात निवडणूक शाखेला बंगळुरू येथील भेल (भारत हेवी इलेक्ट्रिकल) कंपनीकडून एकूण १० हजार व्हीव्हीपॅट, ११ हजार ७२० कंट्रोल तसेच ६,६०० बॅलेट युनिट उपलब्ध झाले. निवडणूक शाखेने ही सर्व मशीन्स‌ सय्यद प्रिंप्री येथील गोदामात जतन केली आहे.

भेल कंपनीच्या आठ तंत्रज्ञांची टीम नाशिकमध्ये दाखल झाली आहे. या टीमने मंगळवारपासून या मशीन्स‌च्या तपासणीचे काम हाती घेतले असून, पुढील महिनाभर ते चालेल अशी शक्यता आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी गोदामाला भेट देत मशीन्स‌ तपासणीची पाहणी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शशिकांत मंगरूळे यांच्यासह निवडणूक शाखेची टीम गोदामामध्ये उपस्थित आहे.

राजकीय पक्षांची पाठ

निवडणूक शाखेने आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या पक्षांना यापूर्वीच पत्र देत मशीन्स‌ तपासणीवेळी उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, पहिल्या दिवशी एकही राजकीय पक्षाचा पदाधिकारी गोदामाकडे फिरकला नाही. त्यामुळे एरव्ही निवडणुका जवळ आल्यावर ईव्हीएमच्या नावाने बोंबा मारणाऱ्या राजकीय पक्षांची उदासीनता यातून अधोरेखित झाली.

हेही वाचा : 

The post नाशिकमध्ये मतदान यंत्रांची तपासणी सुरू, भेल कंपनीची टीम दाखल appeared first on पुढारी.