नाशिकमध्ये मुलींच्या जन्मदरात घसरण

मुलींचा जन्मदर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात मुलींच्या संख्येत गेल्या तीन वर्षांत घट झाली आहे. ग्रामीण भागात जन्म घेणाऱ्या हजार मुलांमागे २०१९ मध्ये ९६३ मुली असलेले प्रमाण २०२२ मध्ये ९३९ मुली एवढे आहे. तीन वर्षांत हे प्रमाण वाढण्याऐवजी ३६ ने कमी झाले आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात असल्या तरी ‘बेटी नको’, ही मानसिकता अजूनही बदलली नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात २०१९ – २० या वर्षात एकूण हजार मुलांच्या मागे ९६३ मुलींची संख्या होती. २०२० – २१ या वर्षात हीच संख्या ४ ने कमी होत ९५९ वर आली. आणि आता २०२१ – २२ या वर्षात तब्बल ३० ने घटत ९३९ इतकी झाली आहे. तालुक्याचा विचार करता पेठ आणि चांदवड वगळता उर्वरित सर्वच तालुक्यांमध्ये मुलींची संख्या कमी झालेली दिसून येत आहे. पेठमध्ये सर्वाधिक एक हजार १५५ तर चांदवडमध्ये एक हजार १६ इतकी संख्या आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये मालेगाव ९७८, नांदगाव ९५४, कळवण ९४२, देवळा ९३९, त्र्यंबक ९३६, इगतपुरी ९३४, बागलाण ९३०, सुरगाणा ९१८, नाशिक ९१३, सिन्नर ९१२, निफाड ९०८, दिंडोरी ९०५ आणि येवला ८९३ यांचा समावेश आहे.

केंद्र शासन असो अथवा राज्य शासन असो मुलींच्या जन्मासाठी विविध योजना राबवित असते. याची अंमलबजावणी करण्याचे काम प्रशासनाचे आहे. अंमलबजावणी करत असताना जनतेपर्यंत या योजना पोहोचणे आवश्यक आहे. मुलींसाठी असलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री, बेटी बचाव, बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना’ यांचा समावेश आहे. मात्र, या योजनांची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक असताना ते होताना दिसत नाही. त्यामुळे आरोग्य विभागासोबतच संपूर्ण जिल्हा प्रशासनाची काळजी वाढली आहे.

लिंगनिदानावर हवे लक्ष

एकूणच २०१९ ते २०२२ या तीन वर्षांत जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मुलींची संख्या झपाट्याने कमी झाली. राज्यात स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी कायदा आहे. त्याची सक्तीने अंमलबजावणीही सुरू आहे. तरीही काही ठिकाणी चोरून लिंगनिदान होत असल्याने मुलींच्या जन्माचा दर घटला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये मुलींच्या जन्मदरात घसरण appeared first on पुढारी.