नाशिकमध्ये ‘राष्ट्रवादी’त राडा, दोन्ही गटात हमरीतुमरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेसमधील राज्यस्तरीय घडामोडींचे तीव्र पडसाद मंगळवारी (दि. ४) नाशिकमध्ये उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या राष्ट्रवादी भवनावर अजित पवार गटाने दावा केल्याने शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यालयावर चाल केली. त्यानंतर अर्धा तास घोषणाबाजी होऊन कार्यकर्ते समोरासमोर आले. शरद पवार गटाने काही काळ ठिय्या मांडून बैठक घेतली. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वातावरण निवळले.

पक्षाच्या शरद पवार आणि अजित पवार गटातर्फे बुधवारी (दि. ५) मुंबईत बोलावलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सूचना देण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात व मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या राष्ट्रवादी भवनावर दोन्ही गटांनी कार्यकर्त्यांना बोलावले होते. अजित पवार-छगन भुजबळ यांचेे कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी तेथे लवकर येत कार्यालयावर दावा सांगितला. यात जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे तसेच प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, कविता कर्डक, बाळासाहेब कर्डक, विष्णूपंत म्हैसधुणे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.

दुपारी शरद पवार गटाच्या नेत्यांनी या ठिकाणी बैठकीचे आयोजन केले होते. या पार्श्वभूमीवर भुजबळ गटाचे समर्थक आधीपासूनच कार्यालयात उपस्थित होते. गोंधळाची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सकाळपासूनच बंदोबस्त ठेवला होता. दुपारनंतर शरद पवार समर्थक या ठिकाणी पोहचल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. उभय बाजूंचे समर्थक भवनासमोरच एकत्र आल्याने वादाला तोंड फुटले. दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शरद पवार गटाच्या समर्थकांना कार्यालयात जाऊ दिले जात नसल्याने वाद विकोपाला गेला. माजी नगरसेवक गजानन शेलार, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, रमेश आवटे, लक्ष्मण मंडाले हे समर्थकांसह शरद पवार गटातर्फे उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष आव्हाड ‘चर्चा करून मार्ग काढा’, अशी भूमिका घेत होेते.

मुंबईला बैठक आहे हे माहीत असूनही यांनी बैठक घेण्यासाठी येथे येण्याची आवश्यकता नव्हती. त्यांनी सोबत गुंड प्रवृत्तीचे लोक आणले असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही प्रवेश नाकारला.

– दिलीप खैरे, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस

आम्ही वैध मार्गाने पक्षाच्या कार्यालयात बैठक घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांनी आम्हाला पोलिसांच्या मदतीने गेटवरच अडविले. आमचा पाठिंबा शरद पवार गटाला आहे. आम्ही त्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहोत.

– कोंडाजी आव्हाड, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते छगन भुजबळ व अजित पवार यांच्यासोबत आहेत. आज काही मोजक्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाशी संबंध नसलेल्या कंपनी कामगार व इतर तरुणांना सोबत आणून गोंधळ घातला.

– अंबादास खैरे, युवक शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, नाशिक शहर

बॅनरवरून सुप्रिया सुळे, जयंत पाटील गायब

राज्यात राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे तसेच जयंत पाटील यांचा फोटो नसल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.

घोषणाच घोषणा

दोन्ही गट समोरासमोर उभे ठाकल्यानंतर ‘देशाचा बुलंद आवाज, शरद पवार.. शरद पवार’, ‘एकच वादा अजितदादा..’, ‘सकाळ, दुपार आणि आता संध्याकाळ, शपथविधीला एकच काळ’ अशा प्रकारच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

हेही वाचा : 

The post नाशिकमध्ये 'राष्ट्रवादी'त राडा, दोन्ही गटात हमरीतुमरी appeared first on पुढारी.