नाशिकरोडसह 35 स्थानकांचा होणार कायापालट

रेल्वे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारच्या अमृत भारत योजनेंतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात 400 कोटींचा खर्च करून 35 रेल्वेस्थानकांचा कायापालट करण्यात येणार आहे. यामध्ये नाशिकरोड, भुसावळ, अकोला, खांडवा आणि अमरावती या प्रमुख स्थानकांचा समावेश आहे. या विकासकामांमुळे भविष्यात विभागातील प्रवाशांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे.

देशभरातील प्रमुख रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. अमृत भारत योजनेमधून या स्थानकांचा कायापालट करण्यात येणार आहे. त्याअंतर्गतच मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील 35 स्टेशनचा पुनर्विकास करताना तेथे विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये स्थानकाचे प्रवेशद्वार रुंद करणे, प्रवाशांच्या सुविधांचे अपग्रेडेशन, रूफटॉप प्लाझा, एक्झिक्युटिव्ह लाउंज, कॅफेटेरियासह अन्य सुविधांचा यात समावेश आहे. त्यासाठी 400 कोटींचा खर्च केला जाणार आहे. विभागातील नाशिकरोड, भुसावळ, अकोला, खांडवा आणि अमरावती या प्रमुख स्थानकांसाठी मास्टर डेव्हलपमेंट प्लॅन करताना त्यासाठी 50 ते 100 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तर उर्वरित 30 मध्यम स्थानकांसाठी पाच कोटी ते 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती मिळते आहे. भविष्यातील वाढती प्रवासी संख्या विचारात घेत स्थानक परिसरात वाहनतळ, पादचारी मार्ग तसेच अन्य सुविधा उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, येत्या तीन वर्षांत या सर्व कामांना मूर्तस्वरूप देण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. वरिष्ठ पातळीवरून सूचना प्राप्त झाल्यानंतर स्थानकांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले जाईल, असे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे.

…या सुविधांवर भर
रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करताना सर्वप्रथम इमारतींवर भर देण्यात येणार आहे. या माध्यमातून रेल्वेची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणताना ग्राहकाभिमुख सेवा देण्यावर रेल्वेचा भर असेल. याशिवाय वेटिंग रूम, कॅफेटेरिया, रेस्टॉरंट आदींसह किरकोळ दुकाने, एका स्टेशनवर एकाच उत्पादनासाठी जागा, सेमिनार आणि मीटिंगसाठी हॉल, एक्झिक्युटिव्ह लाउंज इत्यादींचे पुनर्गठन केले जाणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिकरोडसह 35 स्थानकांचा होणार कायापालट appeared first on पुढारी.