नाशिकरोड व्यापारी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी दत्ता गायकवाड 

नाशिकरोड www.pudhari.news

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड व्यापारी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी दत्ता गायकवाड तर उपाध्यक्षपदी मनोहर कोरडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल नवनिर्वाचित संचालक, सभासद, बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. त्यात सत्ताधारी सहकार पॅनलने सर्व २१ जागी विजय मिळवला. निवृत्ती अरिंगळे व दत्ता गायकवाड यांनी सहकार पॅनलची निर्मिती केली होती. रिझर्व बँक व सहकार खात्याच्या नियमानुसार विशिष्ट पद्धतीच्या ठेवी व शेअर्स हे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला बंधनकारक असल्याचा ठऱाव वैध असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिल्याने विरोधी परिवर्तन पॅनलच्या अनेक इच्छुकांचे उमेदवारी अर्ज बाद झाले. त्यामुळे सत्ताधारी सहकार पॅनलचे १९ उमेदवार बिनविरोध निवडून आले. महिला गटातील दोन जागांसाठी विरोधकांचा एक अर्ज राहिल्याने सहकार पॅनलच्या रंजना प्रकाश बोराडे, कमल दिनकर आढाव व विरोधक परिवर्तन पॅनलच्या संगीता गायकवाड यांच्यामध्ये लढत झाली. रंजना बोराडे व कमल आढाव यांनी विजय मिळवला.

नवनिर्वाचित अध्यक्षांच्या निवडीसाठी आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार उपनिबंधक गौतम बलसाणे यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या आशानगर येथील मुख्य शाखेच्या सभागृहात बैठक झाली. अध्यक्षपदासाठी दत्ता गायकवाड तर उपाध्यक्षपदासाठी मनोहर कोरडे यांचे एकमेव अर्ज आले. माघारीच्या मुदतीत या दोघांचेच एकमेव अर्ज राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी बलसाणे यांनी अध्यक्षपदी गायकवाड व उपाध्यक्षपदी कोरडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. सभासदांनी दिलेल्या जबाबदारीचे योग्यरित्या पालन करून बँकेला सर्वोच्च शिखरावर नेण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही या दोघांनी दिली. गायकवाड व उपाध्यक्ष कोरडे  यांचा सत्कार संचालकांतर्फे करण्यात आला. संचालक निवृत्ती अरिंगळे, सुनील आडके, रामदास सदाफुले, रमेश धोंगडे, अशोक चोरडिया, प्रकाश घुगे, डॉ. प्रशांत भुतडा, सुनील चोपडा, श्रीराम गायकवाड, सुधाकर जाधव, अरुण जाधव, वसंत अरिंगळे, जगन आगळे, नितीन खोले, गणेश खर्जुल, योगेश नागरे, नितीन पेखळे, रंजना बोराडे, कमल आढाव आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिकरोड व्यापारी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी दत्ता गायकवाड  appeared first on पुढारी.