नाशिक : अंजनेरी ‘रोप-वे’विरोधात पर्यावरणप्रेमी एकवटले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंंबकेश्वर तालुक्यातील प्रस्तावित अंजनेरी ते ब्रह्मगिरी ‘रोप-वे’विरोधात पर्यावरणप्रेमी एकवटले असून, बुधवारी (दि. 6) हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकीत एकत्रित लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आगामी काळात ‘रोप वे’ प्रकल्पाचा प्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत.

शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचा ब्रह्मगिरी-अंजनेरी पर्वत ‘रोप-वे’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रस्तावित प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. अंजनेरी संवर्धन राखीव क्षेत्रातील डोंगरावरून ते थेट ब्रह्मगिरी पर्वतापर्यंत जाण्यासाठी हा प्रकल्प केंद्राच्या योजनेंतर्गत प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे जैवविविधता धोक्यात येणार असल्याने पर्यावरणप्रेमींकडून विरोध दर्शविला जात आहे. या प्रकल्पाविरोधात लढा उभारण्याचा निर्धार पर्यावरणप्रेमींच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीत अंजनेरी-ब—ह्मगिरी पर्वतावरील जैवविविधता, प्रकल्पामुळे होणारी पर्यावरणहानी तसेच संभाव्य प्रदूषण आदींबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी आपलं पर्यावरणचे शेखर गायकवाड, नमामि गोदा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित, गिव्ह संस्थेचे रमेश अय्यर, वृक्षवल्ली फाउंडेशनचे तुषार पिंगळे, ग्रीन रिव्हॉल्यूशनचे डॉ. संदीप आहिरे, दत्तू ढगे, जुई पेठे, मनीष बाविस्कर, प्रशांत परदेशी आदी उपस्थित होते.

गोडसेंना निवेदन
गरज नसतानाही रोप-वे प्रस्तावित करण्यात आला आहे. प्रसाद योजनेतून उपलब्ध निधी स्थानिक विकासासाठी वापरण्याची गरज आहे. रोप-वेविरोधात पाठपुरावा करण्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब केला जाईल. त्याचाच एक भाग म्हणून खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेऊन पर्यावरणप्रेमींकडून निवेदन दिले जाणार आहे.

The post नाशिक : अंजनेरी ‘रोप-वे’विरोधात पर्यावरणप्रेमी एकवटले appeared first on पुढारी.