नाशिक अपर आयुक्तालयात होणार खांदेपालट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आदिवासी विकास विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले असून, प्रशासनाकडून बदलीपात्र कर्मचाऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. नाशिक अपर आयुक्तालयातील वर्ग तीनचे तब्बल सातशे कर्मचारी बदलीसाठी पात्र आहेत. त्यात विनंती तसेच प्रशासकीय बदलीपात्र कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पुढील महिन्यात या कर्मचाऱ्यांमध्ये खांदेपालट होणार आहे.

नाशिक अपर आयुक्तालयाच्या अखत्यारित नाशिकसह कळवण, धुळे, नंदुरबार, तळोदा, यावल, राजूर आदी प्रकल्प कार्यालये येतात. या सातही कार्यालयांतर्गत २११ शासकीय आश्रमशाळा आणि १८१ वसतिगृहे असून, तिथे लाखभर विद्यार्थी धडे गिरवितात. या आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये वर्ग तीनचे ३ हजार ५९५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २ हजार ३३४ पदे भरलेली असून, १ हजार २६१ पदे रिक्त आहेत. कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ७०० कर्मचारी बदलीसाठी पात्र ठरले आहेत. विनंती आणि प्रशासकीय बदलीपात्र कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास समसमान आहे.

दरम्यान, वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्या बदलीच्या प्रक्रियेचे नियोजन प्रकल्प कार्यालयस्तरावरून सुरू आहे. राज्यात 30 जूनपर्यंत कोणत्याही बदल्या न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने बदली प्रक्रियेला काही अंशी ब्रेक लागला आहे. जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे बदलीपात्र कर्मचाऱ्यांचा चांगल्या जागेसाठी जीव टांगणीला लागला आहे.

वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया अपर आयुक्त, तर वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया प्रकल्प कार्यालयस्तरावरून राबविण्यात येत आहे. बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. वरिष्ठांच्या सूचनेनंतर बदलीचे आदेश काढले जातील.

– संदीप गोलाईत, अपर आयुक्त (नाशिक)

संवर्गनिहाय बदलीपात्र कर्मचारी संख्या

पद संवर्ग-कर्मचारी संख्या

मुख्याध्यापक- ४२

उच्च माध्यमिक शिक्षक- ८७

माध्यमिक शिक्षक- १३२

प्राथमिक मुख्याध्यापक- ५

पदवीधर प्राथमिक शिक्षक- ४०

प्राथमिक शिक्षक – २१४

अधीक्षक पुरुष- ६०

अधीक्षक महिला – ५६

ग्रंथपाल- ८

प्रयोगशाळा सहायक- ५

गृहपाल पुरुष- ३२

गृहपाल महिला- १९

एकूण- ७००

हेही वाचा :

The post नाशिक अपर आयुक्तालयात होणार खांदेपालट appeared first on पुढारी.