नाशिक : उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यास आयमा कटिबद्ध : धनंजय बेळे

आयमा www.pudhari.news

सिडको : पुढारी वृत्तसेवा

सातपूर, अंबड आणि नाशिक तालुक्यातील औद्योगिक वसाहतींतील उद्योजकांना भेडसावत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी अंबड इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) कटिबद्ध असून, अन्य शासकीय यंत्रणांच्या मदतीने त्याचे निराकरण करण्यात येईल, अशी माहिती आयमाचे बीओटी चेअरमन धनंजय बेळे यांनी दिली. तसेच अधिकाऱ्यांची मनमानी खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

सातपूर, अंबड आणि नाशिक तालुक्यातील उद्योजकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी आयमाच्या पुढाकाराने सातपूरच्या निमा हाउसमध्ये उद्योजक आणि मूलभूत सेवासंबंधित सर्व यंत्रणांची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ, सरचिटणीस ललित बूब, सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता जयंत बोरसे, ईएसआयचे अधीक्षक डॉ. राजश्री पाटील, डीआयसीचे वरिष्ठ अधिकारी रमेश निकाळे, महापालिका विभागीय अधिकारी जयश्री बैरागी आदी उपस्थित होते.

सातपूर, अंबड आणि नाशिक तालुक्यातील औद्योगिक वसाहतींमुळे जिल्ह्याच्या विकासाला मोठा हातभार लागला आहे. औद्योगिकीकरणामुळे रोजगाराच्या संधी वाढल्या असल्या तरी मूलभूत समस्यांनीही डोके वर काढले आहे. त्यामुळे उद्योजकांच्या मागणीवरून बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. या समस्यांवर उपाय शोधण्याच्या प्रयत्नात असल्याचेही बेळे यांनी नमूद केले. निमा ही संस्था दोन वर्षांपासून बंद असल्यामुळे उद्योजकांना कोणी वाली नाही असे जर कोणी समजत असेल तर तो गैरसमज काढून टाका, आयमा भक्कमपणे सर्व उद्योजकांच्या पाठीमागे आहे. आयमाचे नाव जरी अंबड इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन असले तरीसुद्धा आयमा ही संपूर्ण जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या उद्योजकांसाठी काम करणारी संस्था आहे, याचा खुलासाही यावेळेस बेळे यांनी आवर्जून केला. जिल्ह्यातील उद्योजकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आयमा सतत अग्रेसर असते. उद्योजकांच्या अनेक समस्या प्रलंबित असल्याने त्या सोडविण्यासाठीच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. गोंदे आणि सिन्नर येथील बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला असून उद्योजकांच्या विविध अडचणींना वाट मोकळी करून दिली आहे. उद्योजकांच्या प्रश्नांबाबत येत्या काही दिवसांतच अग्रक्रमाने मार्ग काढण्याचे आश्वासन आयमा अध्यक्ष निखील पांचाळ यांनी यावेळी दिले. यावेळी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या वीज मंडळासह विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना बेळे यांनी चांगलेच फैलावर घेतले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्यासाठी उद्योजकांचा आटापिटा सुरू असताना काही यंत्रणांच्या जुलमी कारभारास कंटाळून उद्योजकांवर कंपन्या अन्यत्र स्थलांतरित करण्याची वेळ येत आहे. हे सहन केले जाणार नसल्याचा इशाराही बेळे यांनी यावेळी दिला. बैठकीत आयमाचे माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे, जे. आर. वाघ, रमेश पवार, मधुकर ब्राह्मणकर, जयप्रकाश जोशी, सुधाकर देशमुख, आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सुदर्शन डोंगरे, कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे, राधाकृष्ण नाईकवाडे आदींसह सुमारे 150 हून अधिक उद्योजकांसह सातपूर, अंबड, विल्होळी आणि नाशिक तालुक्यातील उद्योजक उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यास आयमा कटिबद्ध : धनंजय बेळे appeared first on पुढारी.