नाशिक : ‘एसएमबीटी’च्या वेदनाशामक जेलला मिळाले पेटंट

एसएमबीटी www.pudhari.com

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिट्यूट ऑफ डी.फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश उशीर व प्रा. डॉ. सुदर्शन सिंग यांच्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे. पुढील 20 वर्षांपर्यंत या पेटंटचे अधिकार ‘एसएमबीटी’कडे असणार आहेत. या संशोधनामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा शरीरावर सूज येणार्‍या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अधिक माहिती अशी की, लहानपणी काही दुखत असल्यास जायफळ व तेल यांचे मिश्रण हे आजी शरीरावर लावत असे. त्याच संकल्पनेतून जायफळात नेमके काय असावे? याचा शोध डॉ. उशीर व त्यांच्या समूहाने घेतला. अनेक वर्षे बारीक-सारीक गोष्टींचा अभ्यास सुरू होता. दरम्यान, जायफळात अशी काही गुणसत्त्वे आहेत, जी वेदनाशामक असून शरीराचे दुखणे कमी करण्यास रामबाण उपाय ठरू शकतात, असे निदर्शनास आले. डॉ. उशीर म्हणाले की, जायफळ वेदनाशामक औषध असून इतर वेदनाशामक औषधांनादेखील ते बूस्टर म्हणून काम करू शकते. पेटंट नोंदणी झाल्यानंतर औषधाला रुग्णांपर्यंत कशा प्रकारे पोहोचवावे याबाबतचा अभ्यास करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

जेल असे काम करणार…
हर्बल प्रकारात मोडणारे हे प्रॉडक्ट आहे. अनेक नागरिकांना वयोमानानुसार, गुडघेदुखीचा त्रास होतो, शरीरावर सूज येते, सांधेदुखीसारख्या असह्य आजारांचा त्रास असतो. बाजारातील अनेक प्रकारच्या मलमांमुळे फरक न पडलेल्या रुग्णांना या माध्यमातून चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘एसएमबीटी’च्या वेदनाशामक जेलला मिळाले पेटंट appeared first on पुढारी.