नाशिक : ककाणे खेडगाव पुलाला पडलेल्या भगदाडामुळे प्रवाशांची दररोज मृत्यूशी झुंज

ककाणे गाव www.pudhari.news

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा

ककाणे ते खेडगाव रस्त्यावरील पुलाला मोठे भगदाड पडले आहे. निकृष्ट कामामुळे पडलेल्या भगदाडाने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यातच पुलाला कठडे नसल्याने रात्री वाहने थेट नदीत पडून मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे.

खेडगाव ते ककाणे नदीवर उभारण्यात आलेल्या या पुलामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दळणवळण सोयीचे होते. मात्र, मोठे वाहन या रस्त्याने नेताना कसरत करावी लागत आहे .शेतमाल वाहतुकीसाठी हा पूल आता गैरसोयीचा झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भगदाडामुळे हा पूल अत्यंत धोकादायक झाला असून, कुठल्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे. या पुलासंदर्भात तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. संततधार पावसामुळे तालुक्यातील नदीला पूर आल्याने छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेले होते. पूल छोटा असल्याने पुलावरून पाणी वाहात होते. पुराच्या वेगवान प्रवाहामुळे पुलाचा वरचा भाग व खालच्या बाजूचा भाग वाहून गेला आहे. या पुलाचा काही भाग दोन वर्षांपूर्वी, तर आता पुलाचा मधला भाग पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने खड्डा पडला आहे. तसेच पुलाचा काही भाग पुराच्या पाण्याने धुऊन गेला असून, राहिलेला भागही कमकुवत झाला आहे. या पुलावरून कळवण शहराकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक होेते. त्यात नाकोडा कांदा बाजाराकडे मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा तसेच पुनंद परिसरापाठोपाठ बागलाणचीही वाहतूक याच पुलावरून होते. विद्यार्थी बसेसची वाहतूक याच मागावरून होत असल्याने त्यांचा जीवही धोक्यात आला आहे.

पूल अतिशय धोकादायक झालेला आहे, याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. जर या पुलावर अपघात घडलाच, तर याला प्रशासन जबाबदार राहील. -संदीप वाघ, अध्यक्ष, जय रुद्रा जनसेवा प्रतिष्ठान

हेही वाचा:

The post नाशिक : ककाणे खेडगाव पुलाला पडलेल्या भगदाडामुळे प्रवाशांची दररोज मृत्यूशी झुंज appeared first on पुढारी.