नाशिक : कोरोनाबाधितेचा विनयभंग करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यास वर्षभर कारावास

न्यायालय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यास न्यायालयाने वर्षभर साधा कारावास व ५ हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. कैलास बाबूराव शिंदे (५६, रा. मोठा राजवाडा, भद्रकाली) असे आरोपीचे नाव आहे.

जुने नाशिक येथील कथडा परिसरातील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ८ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी १०.३० वाजता हा प्रकार घडला होता. पीडिता कोरोनाबाधित असल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयातील स्वच्छतागृहात गेल्यानंतर कैलास शिंदे याने पीडितेचा विनयभंग केला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक देवीदास डी. इंगोले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. विद्या देवरे-निकम यांनी युक्तिवाद केला. त्यानुसार साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. चाफळे यांनी आरोपीस शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून अंलमदार प्रशांत बी. जेऊघाले, आर. जी. तांदळकर यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा :

The post नाशिक : कोरोनाबाधितेचा विनयभंग करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यास वर्षभर कारावास appeared first on पुढारी.