नाशिक : ‘गंगा भागीरथी’वरून टीकेचा पाऊस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विधवा ऐवजी गंगा भागीरथी शब्द वापरण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्यामुळे अडचणीत आलेले महिला आणि बालविकासमंत्री लोढा यांनी घूमजाव केले आहे. आज राज्यभरातून महिला संघटनांनी सरकारवर जोरदार टीका करताना विधवांची ओळख उघड करण्यासाठी कोणत्याही शब्दाची गरज नाही, अशी भूमिका घेत हा प्रस्ताव मागे घेण्याची मागणी केली आहे.

विधवा महिलांच्या कल्याणासाठी व त्यांना समाजात योग्य सन्मान मिळावा यासाठी त्यांच्या नावापुढे गं. भा. (गंगा भागीरथी) असा उल्लेख करण्यात यावा, असा प्रस्ताव तयार करण्याची सूचना महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विभागीय सचिवांना केली होती. समाज, धार्मिक आणि कौटुंबिक कार्यात सहभागी होताना अशा महिलांना असमानतेची वागणूक दिली जाते. त्यासाठी विधवा या शब्दाऐवजी पूर्णांगी, स्वयंसिद्धा, सक्षमा अशा शब्दांचा वापर केल्यास या भगिनींना सन्मानतेची वागणूक मिळेल, अशी शिफारस सरकारकडे करण्यात आली. परंतु या प्रस्तावांना महिला संघटनांनी आक्षेप घेतला. उलट यामुळे विधवांची ओळख ठळकपणे होईल, असे परखड मत अनेक महिला संघटनांनी सरकारकडे मांडत मंत्री लोढा यांच्यावर टीका केली आहे.

गं. भा. गंगा भागीरथी हे नाव जुन्या काळातील विधवा महिलांना वापरले जात होते. पण आताच्या तरुण विधवा मुलींच्या त्यांच्या नावापुढे गं. भा. नाव लावणे योग्य राहणार नाही. त्यासाठी श्रीमती शब्द योग्य आहे. आम्ही शहीद जवानांच्या पत्नी आहोत. त्यामुळे आमच्या नावापुढे वीरनारी हाच शब्द योग्य आहे. – रेखा खैरनार, अध्यक्ष, वीरनारी वीरमाता, बहुउद्देशीय सेवाभावी संस्था.

नावात बदल करून काय होणार?
या विषयासंदर्भात सोशल मीडियावर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या व अनेकांनी आपले विचारही मांडले. विधवांसाठी इतर अनेक गोष्टी करण्यासारख्या असताना नावात बदल करून काय होणार? त्या समाजातील वेगळ्या घटक नाहीत. याआधी विधवा महिलांना सापत्न वागणूक समाजातून मिळाली आहे. त्यामुळे आधीच दुखावलेल्या महिलेला नावात बदल करून तिचे दु:ख कमी होणारे नाही.

मी केवळ आजच (जोडीदाराच्या निधनानंतर) नाही, तर लग्न झाल्यापासून गेली तीस वर्षे मी माझ्या नावाआधी श्रीमतीच लावत आहे. सौ. या उपाधीला मी लग्न झाल्यापासून कायम विरोध केला आहे. आधी सौभाग्यवती हे बिरुद गेले पाहिजे. म्हणजे मग पुढचे विधवा, गंगा भागीरथी, अर्धांगिनी, पूर्णांगिनी हे खेळ संपतील. एक पुरुष आयुष्यात आहे म्हणून स्त्री सौभाग्यवती नाही किंवा पुरुष आयुष्यात नाही म्हणून ती दुर्भाग्यवती नाही. – संध्या नरे-पवार, प्रसिद्ध लेखिका.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘गंगा भागीरथी’वरून टीकेचा पाऊस appeared first on पुढारी.