नाशिक : गुन्ह्यात मदत केल्याच्या मोबदल्यात पोलिसाने घेतली दहा हजारांची लाच

पोलीस लाच www.pudhari.news

नाशिक (घोटी/इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
घोटी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस नाईक रविराज जगताप (37) यांनी गुन्ह्यात मदत केल्या प्रकरणात 10 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष रंगेहाथ पकडल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तक्रारदाराच्या नातेवाइकांविरुद्ध घोटी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्याप्रकरणी मदत केल्याच्या व यापूर्वी वेळोवेळी मदत केल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून 10 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. पक्षासमक्ष 10 हजार रुपये लाच स्वीकारली म्हणून जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापळा व तपास अधिकारी पोलिस निरीक्षक अनिल बागूल, पोलिस नाईक अजय गरुड, किरण अहिरराव, प्रकाश महाजन, पोलिस हवालदार संतोष गांगुर्डे या कारवाईत सहभागी झाले होते. नाशिक परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे – वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे घोटी शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी विविध प्रकरणांमध्ये लाच घेत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही शासकीय कामासाठी लाच देऊ नये अथवा कोणी मागणी केल्यास थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. – शर्मिष्ठा वालावलकर, अधीक्षक, नाशिक परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग.

हेही वाचा:

The post नाशिक : गुन्ह्यात मदत केल्याच्या मोबदल्यात पोलिसाने घेतली दहा हजारांची लाच appeared first on पुढारी.