नाशिक : घोटी टोलनाक्यावर ६४ लाखांचा गुटखा जप्त

गुटखा जप्त,www.pudhari.news

घोटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक ग्रामीण पोलिसांनी सोमवारी (दि. 5) घोटी टोलनाक्यावर 64 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. गुटख्याची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.

सोमवारी पहाटे घोटी पोलिस ठाणे हद्दीतील मुंबई-आग्रा महामार्गावरून गुटख्याची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानुसार घोटी पोलिस ठाण्याच्या सपोनि श्रद्धा गंधास यांच्या पथकाने टोलनाका परिसरात सापळा रचून नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणारे वाहन (क्र. एमपी ०४, जीए ८८३०) अडवून तपासणी केली असता वाहनात काळ्या रंगाच्या सुगंधित तंबाखूच्या ११८ गोण्या आढळल्या. त्यांची किंमत ६४ लाख २६ हजार २०० आहे. वाहनासह एकूण ७४ लाख २६ हजार २०० रुपयांचा माल ताब्यात घेतला.

या प्रकरणी वाहनचालक मनीष नारायणप्रसाद शर्मा (वय २६, रा.नेहरूनगर, इंदूर, मध्य प्रदेश) यास ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. घोटी पोलिस ठाण्याच्या सपोनि श्रद्धा गंधास, पोउनि संजय कवडे, पोउनि गांगोडे, हवालदार शेळके, झाल्टे, शिंदे, दोंदे आदींनी ही कारवाई केली. या कामगिरीची दखल घेऊन पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकास १० हजारांचे बक्षीस जाहीर करत अभिनंदन केले आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : घोटी टोलनाक्यावर ६४ लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.