नाशिक : चांदवड तालुक्यात इतक्या हेक्टरवरील पिकांचे झाले नुकसान

चांदवड www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीत 498.80 हेक्टर क्षेत्रफळावरील 983 शेतकर्‍यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात कांदा, द्राक्ष, गहू, मिरची, डोंगळे आदींसह इतर पिकांचा समावेश आहे. अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना मंडळ अधिकारी, तलाठी कृषी सहायक यांना दिल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.

तालुक्यात शुक्रवारी (दि.17) सायंकाळी 6 च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस व गारपीट मोठ्या प्रमाणात झाली. या गारपिटीत लाल कांदा, उन्हाळ कांदा, गहू, कांद्याचे बियाणे (डोंगळे), हिरवी मिरची, टरबूज आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे उत्पादन घेण्यासाठी येणारा खर्चही वाया जाण्याची वेळ शेतकर्‍यावर आली आहे. एकीकडे कांद्यासह एकाही शेतीमालाला योग्य बाजारभाव नसल्याने शेतकरी आधीच हवालदिल आहे. अशातच आता पुन्हा अवकाळी पाऊस व गारपिटीने दस्तक दिल्याने शेतकर्‍यांकडील उरलंसुरलं सर्व हिरावून घेतल्याचे विदारक चित्र आहे. या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी शनिवारी (दि.18) रायपूरचे मंडळ अधिकारी पी. जी. प्रसाद, तलाठी कोमल धांडगे, कृषी सहायक अश्विनी जावरे, ग्रामसेवक विशाल सोनवणे, सरपंच बाबूराव कुंभार्डे, पोलिसपाटील शैला आवारे आदींनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे केले. यावेळी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे हाल पाहून सरकारी बाबूही भाऊक झाले. तळेगावरोही जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, विजय कुंभार्डे, मिलिंद खरे, विठ्ठल आवारे, उत्तम आवारे आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

येथे अवकाळी अन् गारपीट
तालुक्यातील पन्हाळे, न्हनावे, विटावे, उर्धूळ, कानमंडाळे, देवरगाव, काजीसांगवी, गंगावे गावांत शुक्रवारी अवकाळी पाऊस व गारपीट झाली. या गावातील नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना आमदार डॉ. राहुल आहेर यांनी प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील, कृषी अधिकारी विलास सोनवणे यांना दिल्या आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : चांदवड तालुक्यात इतक्या हेक्टरवरील पिकांचे झाले नुकसान appeared first on पुढारी.