नाशिक : चार डॉक्टर, दोन अ‍ॅम्ब्युलन्स चालकांवर गुन्हा; चोरीस गेलेले वैद्यकीय साहित्य हस्तगत

sinner hospital www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय साहित्य चोरी प्रकरणी शहरातील काही प्रतिष्ठित खासगी हॉस्पिटल्सच्या संचालक व अ‍ॅम्ब्युलन्स चालकांची नावे समोर येत होती. तथापि, तपास भरकटू नये म्हणून पोलिसांनी ही नावे गुलदस्त्यात ठेवली होती. परिणामी चोरीचे वैद्यकीय साहित्य खरेदी करणारे खासगी वैद्यकीय व्यावसायिक कोण? याबाबत शहर व परिसरात तर्कवितर्क सुरु होते. मात्र या प्रकरणात शहरातील चार डॉक्टर्स व दोन रुग्णवाहिका चालकांवर सदरचे साहित्य काळ्याबाजारातील आहे याची कल्पना असूनही खरेदी केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बुधवारी (दि.1) पोलिस सूत्रांनी माहिती दिली.

ग्रामीण रुग्णालयातून सुमारे 23 लाख 64 हजार रुपयांचे वैद्यकीय साहित्य चोरीस गेल्याचा प्रकार समोर आल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. चेतन ठोंबरे यांच्या फिर्यादीवरुन 25 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात कार्यरत कंत्राटी एक्स रे टेक्निशियन अनिल वसंत कासार (30, रा. मिठसागरे, ता. सिन्नर) याला अटक करण्यात आली. त्याला जवळपास सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. या दरम्यान पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर त्यात सदरचे महागडे वैद्यकीय साहित्य खासगी हॉस्पिटल्स व खासगी अ‍ॅम्ब्युलन्स चालकांना अतिशय जुजबी किमतीत विक्री केले गेल्याची माहिती समोर आली. जवळपास सात दिवस पोलिसांनी संशयित आरोपी कासार याला खाक्या दाखवला. त्यानंतर त्याने चोरीची पद्धत व विक्री केलेल्या साहित्यासह खरेदीदार डॉक्टर, अ‍ॅम्ब्युलन्स चालकांची नावे सांगितली. पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलिस उपअधीक्षक डॉ. अर्जुन भोसले, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विजय माळी यांनी कसून तपास करीत चोरी करून विक्री केलेले सर्व वैद्यकीय साहित्य संबंधित डॉक्टर्स व अ‍ॅम्बुलन्स चालकांकडून हस्तगत केले. दरम्यान, बुधवारी पोलिस कोठडी संपल्याने संशयित आरोपी कासार याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली आहे. दरम्यान, चोरीस गेलेल्या वीस वस्तूंपैकी सर्व वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. डॉ. गणेश नाईकवाडी यांच्याकडे चोरीच्या सर्वाधिक सहा, डॉ. राहुल शेळके यांच्याकडे पाच, डॉ. उमेश येवलेकर यांच्याकडे तीन, डॉ. श्रीकांत भडांगे यांच्याकडे एक, तर अ‍ॅम्ब्युलन्स चालक शिवा गायधनी याच्याकडे तीन व अल्पेश देवरे याच्याकडे दोन वस्तू वस्तू मिळाल्या. सहायक उपनिरीक्षक रामदास धुमाळ, पोलिस नाईक राहुल निरगुडे, हरीश आव्हाड, किरण पवार आदींच्या पथकाने तपासात यशस्वी कामगिरी केली.

अन् कासार पोपटासारखा बोलू लागला
संशयित आरोपी अनिल कासार याला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी सुरू केली. मात्र, त्याने आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसून दवाखान्यातील अंतर्गत राजकारणाचा मला बळी ठरवला जात असल्याचा आव आणला. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर कासार पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने या प्रकरणातील सर्व माहिती पोलिसांना दिली. एकट्याने चार महिन्यांच्या कालावधीत सॅकमधून एकेक करीत वस्तू लांबविल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

या डॉक्टरांसह अ‍ॅम्ब्युलन्सचालकांचा सहभाग निष्पन्न
या गंभीर प्रकरणात खासगी हॉस्पिटल्सची नावे येत होती. मात्र, पोलिस सूत्रांकडून अधिकृत माहिती दिली जात नसल्याने शहरवासीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सरतेशेवटी या डॉक्टरांची नावे निष्पन्न झाली असून, बसस्थानक परिसरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळी डॉ. राहुल सर्जेराव शेळके, भिकुसा बागेजवळील डॉ. गणेश अशोक नाईकवाडी, गावठा भागातील पारिजात हॉस्पिटलचे डॉ. उमेश भालचंद्र येवलेकर, विजयनगर येथील भडांगे हॉस्पिटलचे डॉ. श्रीकांत सुभाष भडांगे, खासगी अ‍ॅम्ब्युलन्सचालक अल्पेश मन्साराम देवरे (रा. गांवठा, सिन्नर), शिवा ऊर्फ शिवाजी पांडुरंग गायधनी अशा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महागड्या वस्तू कमी किमतीत खरेदीचा मोह
दरम्यान, प्रतिष्ठित खासगी डॉक्टरांनी चोरीचे साहित्य खरेदी केलेच कसे? असा प्रश्न सामान्यांच्या मनात निर्माण झाला. तथापि, संशयित आरोपी अनिल कासार याने सदरचे साहित्य धुळे, नंदुरबार भागातून ‘ब्लॅक’ने मिळाले असल्याची बतावणी करून विक्री केल्याची माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाले. मात्र, महागडी वस्तू काळ्याबाजारातून का होईना पण, कमी किमतीत मिळाल्याने संबंधित डॉक्टरांना खरेदीचा मोह आवरता आला नाही आणि त्यातच ते अडकले गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

डॉक्टरांचाही सुरू होता ‘नन्ना’चा पाढा
संशयित आरोपी अनिल कासार याच्याकडून वैद्यकीय साहित्य विक्री केलेल्या खासगी हॉस्पिटल्सची नावे सांगितली गेल्यानंतर पोलिसांनी एकेक डॉक्टची चौकशी सुरू केली. डॉक्टर तोंड लपवून पळत होते. मात्र, पोलिसांनी सहकार्याचे आवाहन केले. डॉक्टर समोर आले. मात्र आमच्याकडे असे काही साहित्य नसल्याचे छातीठोकपणे सांगू लागले. त्यामुळे पोलिसांची ‘सटकली’. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर मात्र डॉक्टरांनी एकेक करीत वस्तू काढून द्यायला सुरुवात केली. डॉ. येवलेकर यांनी एक वस्तू डॉ. प्रिन्स रायजादे यांना दिली होती. मात्र, त्यांचा या प्रकरणात थेट संबंध नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

हेही वाचा:

The post नाशिक : चार डॉक्टर, दोन अ‍ॅम्ब्युलन्स चालकांवर गुन्हा; चोरीस गेलेले वैद्यकीय साहित्य हस्तगत appeared first on पुढारी.