नाशिक : चिमणी जगायला हवी म्हणून तयार केली घरटी

मुंढेगाव www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चिमण्या लुप्त होण्यामुळे पर्यावरणापुढे अनेक संकटे उभे ठाकले आहेत. त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरातील तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव झाली आहे. यातूनच 2010 पासून 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंढेगाव, ता. इगतपुरी शाळेतील विद्यार्थ्यांनी उपक्रम राबवत चिमण्यांसाठी 125 घरटी तयार केली आहेत.

निसर्गातील पक्ष्यांचे महत्त्व ओळखून चिमण्यांचे अस्तित्व टिकून राहावे, जिव्हाळा निर्माण व्हावा याकरिता विद्यार्थ्यांनी व उपक्रमशील शिक्षक नरेंद्र सोनवणे यांनी पुढाकार घेऊन चला बनवू या चिमणीचे घरटे या उपक्रमांतर्गत 125 घरटी तयार केली. ग्रामीण भागात उन्हाळ्यात चार्‍याची व पाण्याची कमतरता जाणवते त्यामुळे अनेक पक्षी अन्न-पाण्यावाचून स्थलांतरित होतात किंवा मृत्यू पावतात. त्यामुळे पक्ष्यांसाठी काहीतरी करावे या उद्देशाने मुख्याध्यापक भगवान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून टिकाऊ असा चिमण्यांसाठी निवारा तयार केला. त्याचे प्रदर्शन शाळेत भरण्यात आले. तसेच गावातून प्रभातफेरी काढून पक्ष्यांना धान्य व पाणी ठेवण्याबाबत आवाहन करण्यात आले. शिक्षक रेखा शेवाळे, अनिल बागूल, सरला बच्छाव, मालती धामणे, ज्योती ठाकरे, सुनंदा कंखर, हेमलता शेळके, भगवान देशमुख, राजकुमार रमणे आदी शिक्षकांनी यामध्ये सहभाग घेतला. शाळेच्या या उपक्रमाबाबत पालकांनीदेखील समाधान व्यक्त केले.

हेही वाचा:

The post नाशिक : चिमणी जगायला हवी म्हणून तयार केली घरटी appeared first on पुढारी.