नाशिक : जनावरांची गाडी अडवून मागितली 50 हजारांची खंडणी; तिघांना अटक

अटक

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा
जनावरांची वाहतूक करणारी पिकअप जीप अडवून चालकाकडून गाडी सोडण्याच्या बदल्यात पन्नास हजारांची खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार नाशिक-पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे येथे घडला. 22 मे रोजी हा प्रकार घडला होता.

तसेच चालकाला मारहाण व जीपच्या जीपीएस सिस्टीमचे नुकसान करण्यात आले होते. या प्रकरणी चालकाच्या फिर्यादीवरून वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. जीपचालक धनंजय ऊर्फ पप्या रामनाथ शिंदे (35, रा. देवगाव, ता. संगमनेर) यांच्या फिर्यादीवरून वावी पोलिस ठाण्यात तुषार संजय आव्हाड (रा. दोडी) याच्यासह पाच जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. तुषार आव्हाड, मारुती तुकाराम आव्हाड (29), संदीप सोमनाथ आव्हाड (21, दोघे रा. दोडी) अशी संशयितांची नावे आहेत. आणखी दोघा संशयितांनादेखील पोलिसांनी सोमवारी (दि. 19) मध्यरात्री ताब्यात घेतले होते. मात्र, तक्रारदाराकडून त्यांची ओळख पटवण्यात आली नाही. दि. 22 मे च्या दुपारी अडीचच्या सुमारास नांदूरशिंगोटे शिवारात विश्वरत्न मंगल कार्यालयाच्या समोर पिकअप जीप (एमएच 15, सीके 3667) अडवून सहा जणांच्या टोळक्याने चालक धनंजय यास मारहाण केली होती. जीपमधून शेतोपयोगी जनावरांची वाहतूक करण्यात आली होती. जनावरे कत्तलखान्याकडे घेऊन जात असल्याचा आरोप करून तरुणांकडून जीप सोडण्याच्या बदल्यात 50 हजार रुपयांची मागणी चालकाकडे करण्यात आली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणात संशयिताने चालकाकडून फोन पे द्वारे पाच हजार रुपयांची रक्कम स्वीकारली होती. दोन दिवसांपूर्वी पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा:

The post नाशिक : जनावरांची गाडी अडवून मागितली 50 हजारांची खंडणी; तिघांना अटक appeared first on पुढारी.