नाशिक : जितेंद्र भावेंचा नवा पक्ष “निर्भय महाराष्ट्र पार्टी’

निर्भय महाराष्ट्र पक्ष,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

काही दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षातून दुसऱ्यांदा हकालपट्टी झालेल्या जितेंद्र भावे यांनी स्वत:च्या नव्या पक्षाची घोषणा रविवारी (दि. २०) केली. ‘निर्भय महाराष्ट्र पार्टी’ असे पक्षाचे नाव असून भ्रष्टाचार, शिक्षण, आरोग्य, रस्ते, बेरोजगारी निर्मूलन या प्रमुख मुद्द्यांवर पक्ष काम करणार असल्याची माहिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे, महाराष्ट्र उपाध्यक्ष तुषार निकम, राज्य सचिव जगबिर सिंग, कोषाध्यक्ष नितीन रेेवगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

परशुराम साइखेडकर नाट्यगृहामध्ये आयोजित शक्तिप्रदर्शन मेळाव्यात याबाबतची घोषणा करण्यात आली. मेळाव्यादरम्यान, भावे यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर तीव्र शब्दांत टीका केली. या सोहळ्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाची ध्येयधोरणे स्पष्ट करण्यात आली. पक्षाकडून महिन्यातून एकदा मंत्रालय, जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांमधील तक्रार निवारणासाठी ‘निर्भय दिन’ राबविला जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच लवकरच पक्षाच्या इतर शाखा स्थापन केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, कोराेना काळात केलेल्या अर्धनग्न आंदोलनामुळे जितेंद्र भावे प्रकाशझोतात आले होते. त्यानंतरही त्यांचे विविध आंदोलने चांगलीच गाजली. महापालिकेच्या माजी शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याविरोधात केलेल्या आंदोलनामुळे त्यांची आप पक्षातून हकालपट्टी झाली होती. त्यानंतर पुन्हा त्यांना पक्षात घेण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी पुन्हा हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा :

The post नाशिक : जितेंद्र भावेंचा नवा पक्ष "निर्भय महाराष्ट्र पार्टी' appeared first on पुढारी.