नाशिक : जिल्हाधिकारी आठवडाभर रजेवर

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. हे आठवडाभराच्या रजेवर गेले आहेत. तूर्तास त्यांचा पदभार अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, जिल्हाधिकारी तब्बल ८ दिवसांच्या सुटीवर गेल्याने महसूल विभागात त्यांच्या बदलीच्या चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या महिनाभरापासून जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या बदलीच्या चर्चा रंगत आहेत. खुद्द गंगाथरन डी. यांनीच आपण बदलीसाठी इच्छुक असल्याच्या चर्चेला दुजाेरा दिला आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळातच त्यांची बदली होईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. दरम्यानच्या काळात मार्चएन्डमुळे बदल्या पुढे ढकलल्याचे बोलले जात होते. या सर्व घडामोडींत मार्चएन्डचे उद्दिष्ट गाठल्यानंतर गंगाथरन डी. हे तातडीने मोठ्या रजेवर गेले आहेत. २०२२ च्या मार्चमध्ये जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच ते मोठ्या सुटीवर गेल्याने बदलीच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.

सोनवणे, स्वामी यांचे नाव आघाडीवर
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांची बदली अंतिम असल्याचे समजते आहे. त्यांच्या जागेवर मुंबई येथील दुग्ध विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी इच्छुक असल्याची चर्चा महसूलमध्ये आहे. याशिवाय नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांचेही नाव आघाडीवर आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्हाधिकारी आठवडाभर रजेवर appeared first on पुढारी.