नाशिक : जिल्हाधिकार्‍यांचे आदेश : जलयुक्त शिवारसाठी यंत्रणांना वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागणार

जलयुक्त शिवार योजना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘अल निनो’च्या संकटामुळे यंदा पाऊस लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे उशिरा पाऊस आल्यास त्याचा फायदा करून घेण्यासाठी जलयुक्त शिवार-2.0 अंतर्गत गावांमध्ये हाती घेण्यात येणार्‍या कामांसाठी जिल्हाधिकार्‍यांनी डेडलाइन ठरवून दिली आहे. त्यानुसार दि. 8 जूनपर्यंत यंत्रणांना सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

शासनाने राज्यभरात जलयुक्त शिवार अभियान टप्पा-2 राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून राज्यात पाण्याचे स्रोत व जलसाठ्यांच्या क्षमतेत वाढ करण्यासह पाणी साठवणुकीसाठी उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांमधील 231 गावांची जलयुक्त शिवार योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी नुकतीच यंत्रणांची बैठक घेत मार्गदर्शन केले. अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनला ऑगस्टपर्यंत उशीर होऊ शकतो. त्यादृष्टीने जिल्हास्तरावर गावांच्या निवडीसह तेथील पाण्याचे लेखापरीक्षण करणे, आराखडा तयार करणे, ग्रामसभेकडून आराखडा मंजूर करवून घेणे या सर्व प्रक्रियेसाठी जिल्हाधिकार्‍यांनी कालमर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार दि. 8 जूनपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करावयाच्या आहेत. जेणेकरून मान्सून सुरू होण्यापूर्वी 45 कोरड्या दिवसांच्या संभाव्य कालावधीचा लाभ घेता येईल. तसे झाल्यास पुढील उन्हाळ्यापर्यंत कामांचा परिणाम दिसून येईल, असा विश्वास जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केला.

अशी आहे कालमर्यादा…
24 ते 27 एप्रिल शिवार फेरी
28 एप्रिल ते 3 मे गाव आराखडा, ग्रामसभेची मान्यता
4 ते 7 मे तालुका समित्यांची आराखड्याला मान्यता
8 ते 10 मे जिल्हा समितीची मान्यता
11 ते 17 मे अंदाजपत्रक
18 ते 25 मे तांत्रिक मान्यता
26 ते 29 मे प्रशासकीय मान्यता
30 मे ते 8 जून निविदा प्रक्रिया, प्रसिद्धी व स्वीकृती

समित्या गठीत
जलयुक्त शिवारच्या कामांसाठी गाव, तहसील आणि जिल्हास्तरावर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. प्रत्येक समितीकडे मृद व जलसंधारणाची कामे सोपविण्यात आली. गावपातळीवरील समित्यांनी गावात फिरून गावातील पाण्याच्या वापराचे – पिण्याच्या आणि पिण्यायोग्य नसलेल्या हेतूंसाठी, पाणी आणि मृदसंधारणासाठी आराखडा तयार करायचा आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्हाधिकार्‍यांचे आदेश : जलयुक्त शिवारसाठी यंत्रणांना वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागणार appeared first on पुढारी.