नाशिक : जिल्हा रुग्णालयात रुग्णांना ताटाऐवजी भांड्यात जेवण

जिल्हा रुग्णालय नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा शासकीय रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांवर उपचार होतात. या रुग्णांना दुपारी १२ वाजता आणि रात्रीचे जेवण ताटात देणे अपेक्षीत आहे. मात्र वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे मोजक्या रुग्णांना ताटात तर उर्वरीत रुग्णांना त्यांच्याजवळ उपलब्ध असेल त्या भांड्यामध्ये जेवन घ्यावे लागत असल्याचे चित्र राेजचेच आहे. त्यामुळे रुग्णांना आहार कमी मिळत असल्याने त्यांची उपासमार तर शासनाची फसवणूक होत असल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यासह परजिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. त्यात बहुतांशी रुग्ण आदिवासी बहुल तालुक्यांमधील आहेत. अशा रुग्णांची नोंद झाल्यानंतर त्यांना सकाळ-सायंकाळ जेवण, नाष्टा, दूध, फळं दिले जातात. मात्र जेवणाची वेळ ठेकेदार व त्याच्याकडील कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार असल्याचे दिसते. सकाळी आठ ते नऊ वाजेदरम्यान नाष्टा, दुपारी बारा वाजता जेवण आणि सायंकाळी ५ ते ६ वाजता रात्रीचे जेवन रुग्णांना दिले जाते. त्यामुळे सायंकाळी सहा ते सकाळी नऊ या वेळेपर्यंत रुग्णांना उपाशी रहावे लागत असल्याचे चित्र आहे. दुपारी १२ वाजेनंतर जेवन केल्यानंतर अनेक रुग्ण सायंकाळचे जेवन घेऊन ठेवतात व रात्री त्यांना भूक लागल्यावर जेवतात. अशा वेळी जेवण थंड झाले असले तरी नाईलाजास्तव त्यांना खावे लागते.

रुग्णांना ताटात जेवण वाढणे अपेक्षीत असतानाही संबंधित यंत्रणा रुग्णांकडील भांड्यातच जेवण देतात. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना जेवन घेण्यासाठी भांड्याची शोधाशोध करावी लागते. अशावेळी मिळेल त्या भांड्यात किंवा झाकणात जेवन घ्यावे लागते. एकाच भांड्यात किंवा झाकणात भाजी पोळी, वरण भात एकत्रित घ्यावा लागल्याने जेवणाची चवही समजत नसल्याचे रुग्णांची तक्रार आहे. प्रत्यक्षात सायंकाळचे जेवण सात वाजेनंतर देणे अपेक्षीत असताना पाच ते सहा दरम्यान जेवण पुरवले जाते व किचन बंद केले जाते. त्यामुळे रुग्णांच्या सोयीसाठी किचन व्यवस्था आहे की संबंधित ठेकेदार व त्याच्याकडील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ही व्यवस्था उभारली आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आहार विभागाशी संबंधित कर्मचाऱ्याकडे विचारणा केली. त्यावर कर्मचाऱ्याने सर्वांना सायंकाळी साडे सहा वाजता जेवण दिले जाते, असे सांगितले. तसेच खबरदारी म्हणून बुधवारी (दि.१४) साडे सहा वाजता जेवण वाटण्यात आले. मात्र प्रत्यक्षात याआधी सहाच्या आधीच जेवण वितरीत केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत डॉ. थोरात यांनी आहार विभागातील कर्मचाऱ्यास सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत.

जेवण वाढताना आढळल्या या त्रुटी

– रुग्णांना त्यांच्या खाटेजवळ जाऊन जेवण देणे अपेक्षीत आहे. मात्र संबंधित कर्मचारी एका जागेवर उभे राहून सर्वांना बोलवून जेवण वाढतात. त्यामुळे रुग्णांसोबत नातलग नसल्यास रुग्णांना अडथळे पार पाडत जेवण घ्यावे लागते.

– मोजक्याच रुग्णांना ताटात जेवण दिले जाते तर उर्वरीत रुग्ण त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या भांड्यात जेवण घेतात.

– एकाच चमच्याने भाजी, भात, वरण दिले जाते.

– रात्री रुग्णांना दूध देणे अपेक्षीत असताना ते दिले जात नसल्याचा आरोप होत आहे.

– रुग्णांना अनेकदा फळं, अंडी, सूप मिळत नसल्याच्याही तक्रारी आहेत.

– ताटाऐवजी दुसऱ्या भांड्यामध्ये जेवण दिल्यास रुग्णांना आवश्यक तेवढा आहार मिळत नाही

हेही वाचा : 

The post नाशिक : जिल्हा रुग्णालयात रुग्णांना ताटाऐवजी भांड्यात जेवण appeared first on पुढारी.