नाशिक : तब्बल तीस वर्षांच्या प्रतिक्षेनंतर स्मारकाचे स्वप्न पूर्ण

त्र्यंबकेश्वर www.pudhari.news

नाशिक (ञ्यंबकेश्वर): पुढारी वृत्तसेवा
ञ्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या प्रांगणात स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि ञ्यंबकेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार करणारे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे पुतळे विराजमान करण्यात आल्याने तब्बल तीस वर्षांच्या प्रतिक्षेनंतर शहरवासियांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेच्या स्वारीवर जाताना 31 डिसेंबर 1663 रोजी भगवान ञ्यंबकराजाची महापूजा केली होती. तसेच श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी 26 डिसेंबर 1755 रोजी ञ्यंबकेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार सुरू केला. या दोन्ही लढवय्ये वीरपुरुषांचे स्मारक म्हणून पुतळा स्थापित करावा, यासाठी 1992 पासून प्रयत्न सुरू होते. पुणे येथे वेदमहर्षी कै. विनायक घैसास यांच्या जयंती महोत्सवात ञ्यंबकेश्वरचे तत्कालीन नगराध्यक्ष कै. मुरलीधर थेटे यांचा राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तेव्हा घैसास गुरूजी यांनी नानासाहेब पेशवे यांचे स्मारक ञ्यंबकेश्वरला उभारण्याची संकल्पना मांडली होती. माजी नगराध्यक्ष यादवराव तुंगार यांच्या अध्यक्षतेखाली गिरीष दिक्षीत, सोमनाथ भालेराव, दामोदर अडसरे आणि मुरलीधर थेटे या सदस्यांची मिळून स्मारक समिती स्थापन करण्यात आली होती.

ज्येष्ठ इतिहासतज्ञ वालावलकर यांच्या मागर्दशनाखाली नाशिकचे सुप्रसिध्द शिल्पकार मैंद बंधु यांच्या कडुन नानासाहेब पेशवे यांचा अत्यंत आकर्षक असा पुतळा तयार झाला.तथापी जागेअभावी पुतळा संस्थानच्या इमारतीत ठेवण्यात आला. दरम्यानच्या काळात गिरीष दिक्षीत, सोमनाथ भालेराव आणि दामोदर अडसरे यांचे निधन झाले. मागच्या दोन वर्षात यादवराव तुंगार आणि त्यानंतर बाबुराव थेटे यांचे निधन झाले. समितीच्या सदस्यांनी कला संचनालय, पोलीस आयुक्त, उपमुख्य वास्तुशास्त्र सार्वजनीक बांधकाम विभाग (औरंगाबाद) अशा शासकीय यंत्रणांच्या परवानग्या मिळविण्यासाठी हयात असेपर्यंत प्रयत्न सुरू ठेवले होते. ञ्यंबक नगर परिषदेनेदेखील ठराव केला होता. मात्र त्याच मुर्त स्वरूप येत नव्हते. गत अडीच वर्षात न्या. विकास कुलकर्णी यांनी कार्यभार हाती घेतला आणि मंदिर परिसराच्या कायापालटावर भर दिला. विश्वस्त भुषण अडसरे, तृप्ती धारणे, अ‍ॅड पंकज भुतडा, संतोष कदम, प्रशांत गायधनी, डॉ. सत्यप्रिय शुक्ल, दिलीप तुंगार यांनी पुतळ्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला. देवस्थान ट्रस्टने त्याच्या एका बाजूस छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसर्‍या बाजूस श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे पुतळे उभारले आहेत.

दर्शनबारी प्रांगणात बसविण्यात आलेले पुतळे पाहून ञ्यंबकवासीयांचे स्वप्न पुर्ण झाले आहे. याबाबत देवस्थान ट्रस्टने प्रलंबीत काम मार्गी लावले आहे.- गोविंदराव मुळे, माजी नगरसेवक.

हेही वाचा:

The post नाशिक : तब्बल तीस वर्षांच्या प्रतिक्षेनंतर स्मारकाचे स्वप्न पूर्ण appeared first on पुढारी.