नाशिक : तर मनपा आयुक्तांना काळे फासणार; राष्ट्रवादीचे मनपा मुख्यालयात निदर्शने

मालेगाव www.pudhari.news

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
मुकुंदवाडीत क्रीडांगणासह इतर विकासकामांसाठी दीड कोटीचा निधी मंजूर असूनही केवळ अतिक्रमणामुळे हे काम रखडले आहे. हे अतिक्रमण हटविण्यात मनपा प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने मनपा मुख्यालयात निदर्शने केलीत. महानगराध्यक्ष तथा माजी आमदार आसिफ शेख यांनी आयुक्त भालचंद्र गोसावी यांना काळे फासण्याची तयारी केली होती, परंतु ते अनुपस्थित असल्याने त्यांच्या दालनाबाहेरील नामफलकाला काळे फासत माघार घेण्यात आली. यावेळी आयुक्तांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मुकुंदवाडीतील (मुन्शी शाबाननगर) सर्व्हे नंबर 211 या भागात क्रीडांगण, सभागृह, संरक्षक भिंत आदी कामांसाठी दीड कोटीचा निधी मंजूर होऊन निविदा प्रक्रियादेखील झाली आहे. कार्यादेश झाला असला, तरी केवळ त्या ठिकाणावर अतिक्रमण असल्याने काम ठप्प आहे. हे अतिक्रमण काढून त्यांचे पुनवर्सन करावे, यासाठी वारंवार पाठपुरावा झाला. पोलिस विभागानेही मनपाने बंदोबस्ताची फी भरताच सहकार्य करण्याची भूमिका घेतली असली, तरी केवळ मनपाचे अधिकारी फी भरत नसल्याने अतिक्रमण निर्मूलन होऊ शकलेले नाही. आयुक्त गोसावी हे राजकीय दबावातून या अतिक्रमणाला पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत माजी आमदार शेख यांच्यासह माजी सभागृहनेते असलम अन्सारी आदींनी महापालिकेत सोमवारी (दि. 5) दुपारी धडक दिली. आयुक्तांच्या दालनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते उपस्थित नसल्याने सुरक्षारक्षकांनी त्यांनी रोखले. त्यामुळे संतप्त शेख यांनी आयुक्तांच्या नामफलकाला काळे फासत तीव्र नाराजी व्यक्त केली. आयुक्तांवर गंभीर आरोप करीत त्यांनी कार्यप्रणालीत सुधारणा न केल्यास भविष्यात त्यांना काळे फासण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनाने मनपात गोंधळ उडाला. मात्र, चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

लाचखोरीची बाधा
मनपात 682 पदांची भरती होत आहे, त्यासाठी प्रतिनियुक्तीसाठी 15 लाख रुपयांची मागणी माजी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आयुक्त करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी शेख यांनी केला. बिले काढण्यासाठी 10 टक्के वसुली होतेय. दोन महिला बचतगटांकडून पाच-पाच लाखांची मागणी झाल्याची तक्रार असल्याचे सांगून शेख यांनी, राजकीय वरदहस्तातून मालेगावकरांची लूट होत असून, तिचा भांडाफोड करण्याचा इशारा यावेळी दिला.

* गुरुवार वॉर्डातील विशेषत: शब्बीरनगर, आझादनगर, मुन्शी शाबाननगर, हिलालपुरा, गुलशीरनगर येथील नागरिकांना मुकुंदवाडीतील क्रीडांगण, सभागृहाचा लाभ होणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निधीतून हे काम होणार होते. परंतु, महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना सोयी-सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप माजी आमदार शेख यांनी यावेळी केला.

The post नाशिक : तर मनपा आयुक्तांना काळे फासणार; राष्ट्रवादीचे मनपा मुख्यालयात निदर्शने appeared first on पुढारी.