नाशिक : दबा धरुन बसलेल्या बिबट्याच्या जीवघेणा हल्ल्यात शेतकरी बालंबाल बचावला

सोनजांब बिबटया www.pudhari.news

नाशिक (शिंदवड/दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील सोनजांब येथील शेतकरी रात्रीच्या वेळी विजपंप सुरु करताना गेले असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत गंभीर जखमी केले असुन त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.

दिंडोरीतील पूर्व भागात अनेक दिवसांपासून बिबट्यांचा संचार वाढला असून रविवारी, दि.18 बाकेराव जाधव हे घरातील पाणी भरण्यासाठी शेतातील वीजपंप सुरु करण्यासाठी दुपारी 12 वाजता गेले. पावसाची संततधार देखील सुरु असताना वीजपंप सुरु करत पाणी भरून झाल्यावर त्यानंतर पुन्हा शेतात जावून वीजपंप बंद करुन ते माघारी फिरले. तेवढ्यात तेथे दबा धरुन बसलेल्या बिबट्याने जाधव यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. त्यांच्यात मोठी झटापट झाली आणि बिबट्याला पळवण्याचा प्रयत्न केला. परंतु पुन्हा बिबट्याने हल्ला चढवला. या झटापटीत जाधव गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना खेडगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.

बिबट्याच्या हल्ल्याने भितीचे वातावरण: 

बिबट्याने थेट माणसांवर हल्ले सुरु केल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी, दि.18 रात्री देखील बिबट्याने एका वासरावर देखील हल्ला केला. रात्रीच्यावेळी पिकांवर फवारणी करतांना ट्रॅक्टरच्या समोर देखील बिबटे दिसत असल्याने द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीलाच घटना घडत आहेत. रात्री अपरात्री बागांना फवारणी करायची तरी कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. लवकरात लवकर परिसरात पिंजरे वाढवून बिबटे जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी दिंडोरी पुजा जोशी, वणीचे वनपरिमंडळ अधिकारी तुंगार आर व्ही, वन परिमंडळ अशोक काळे, वनरक्षक एच डी महाले, डि ए वाघ, ए एस टेकनर, परशराम भोये आदी वनअधिकारी उपस्थित होते. तसेच मोहम्मद सैय्यद, पप्पु महाले, सोनजांब येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

सोनजांब व परिसरात दिवसा बिबट्याने हल्ला करायला सुरुवात केली आहे. शेती  तरी कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. बिबट्याचे दर्शन पूर्वीच झाले होते. त्यावेळीच पिंजरा लावण्याची गरज होती. त्याचवेळी वनविभागाने पिंजरा लावला असता तर कदाचित हा हल्ला झाला नसता. तसेच या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत मिळावी व बिबटे पकडण्यासाठी वनविभागाने हायटेक उपाययोजना करण्याची गरज आहे. – विजय जाधव, शेतकरी, सोनजांब.

हेही वाचा:

The post नाशिक : दबा धरुन बसलेल्या बिबट्याच्या जीवघेणा हल्ल्यात शेतकरी बालंबाल बचावला appeared first on पुढारी.