नाशिक : दहा तालुक्यांनी ओलांडली पावसाची सरासरी 

मुसळधार पाऊस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असली, तरी यंदाच्या वर्षी जिल्ह्यावर त्याने कृपावृष्टी केली आहे. ऑगस्टपर्यंत तब्बल दहा तालुक्यांमध्ये पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे, तर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 95 टक्के पर्जन्य पाऊस झाला आहे.

जिल्ह्यामध्ये जून महिन्यात पावसाने काहीसा लहरीपणा दाखविला होता. पुढील दोन महिन्यांत मात्र, पावसाने सर्व कसर भरून काढली. त्यामुळे निम्म्याहून अधिक तालुक्यांत पावसाने सरासरी गाठली आहे. नांदगावदेखील सरासरी ओलांडण्याच्या मार्गावर असून, तालुक्यात 99.6 टक्के पावसाची नोंद झाली. दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत पावसाने उघडीप दिली असली, तरी चालू महिन्यात 1 ते 28 ऑगस्ट या काळात सरासरी 219 मिमी पर्जन्याची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पावसाच्या तुलनेत हे 98 टक्के इतके प्रमाण आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ व सुरगाणा हे तालुके वगळता अन्यत्र चालू महिन्यातील सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्याचे 1 जून ते 30 सप्टेंबर या चार महिन्यांचे सरासरी पर्जन्यमान 934 मिमी इतके आहे. यंदाच्या वर्षी आतापर्यंत 885 मिमी पाऊस पडला असून, हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या 95 टक्के आहे. त्यातही दिंडोरी तालुक्यात वार्षिक सरासरीच्या 180 टक्के पाऊस झाला आहे. त्याखालोखाल कळवणमध्ये 142, तर चांदवड व देवळ्यात प्रत्येकी 131 टक्के पावसाची नोंद करण्यात आली. तर इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर व येवल्यात मात्र, सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. दरम्यान, पावसाचा अद्यापही एक महिना बाकी आहे. या कालावधीत तो वार्षिक सरासरी गाठेल, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

इगतपुरीत केवळ 53 टक्के पाऊस :
महाराष्ट्राची चेरापुंजी अशी ओळख असलेल्या इगतपुरीत यंदाच्या वर्षी सर्वात कमी पाऊस झाला आहे. तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान 3 हजार 58 मिलिमीटर असताना, आतापर्यंत 1668 मिमी म्हणजेच 53 टक्के पाऊस झाला, तर त्र्यंबकेश्वरमध्ये हेच प्रमाण 82.2 टक्के असून, येवल्यात 90.1 व सिन्नरला 91 टक्के पावसाची नोंद करण्यात आली.

हेही वाचा:

The post नाशिक : दहा तालुक्यांनी ओलांडली पावसाची सरासरी  appeared first on पुढारी.