राहत्या घरात कोब्रा जातीच्या नागाची ५ पिल्ले! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

cobra cub

सिडको; पुढारी वृत्तसेवा : साप म्हटल्यावर आपल्या अंगावर काटा येतो. तेच साप जर घरात सापडले तर त्याहून जास्त भीती असते. डिजीपी नगर २ येथील केवल पार्क भागात एका घरात कोब्रा जातीच्या नागाची ५ विषारी पिल्ले आढळली. सर्पमित्रांनी ते शिताफीने पकडल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

सर्पमित्र तुषार गोसावी यांना डीजीपी नगर २ मधील अष्टविनायक नगर, केवल पार्क येथे गजानन ताथे यांच्या रो हाऊसमध्ये सापाची पिल्ले असल्याची माहिती नागरिकांनी दिली. गोसावी तत्काळ संबंधित घरी पोहचले. त्यांनी मोठ्या शिताफिने ही पिल्ले पकडली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

असे पकडले कोब्रा जातीचे नाग

सर्पमित्र गोसावी यांनी घराची पाहणी केली असता चेंबरजवळ डग मध्ये नागीण दिसली. मात्र तिच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी घुसीने केलेल्या बिळाच्या मार्गाने ती पसार झाली. या नागीणीला शोधत असताना टॉयलेटच्या जाळीच्या मार्गाने किचनमध्ये शिरलेली काही पिल्ले आढळली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी बेडरूममध्ये मिळालेली काही अशी एकूण पाच पिल्ले शिताफीने पकडण्यात आली. कोब्रा जातीच्या विषारी नागाची ही पिल्ले आहेत. नागीण एकावेळी दहा ते बारा पिल्ले देते. त्यामुळे आणखी काही पिल्ले आहेत का याचा शोध घ्यावा लागेल असेही सर्पमित्र यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अंडी देऊन नागीण तेथून निघून गेली असली तरी ती एक ते दीड महिने पिल्लांची रखवाली करीत असते असे देखील ते यावेळी म्हणाले.

नागरिकांनी खबरदारी घ्यावी. पावसाळ्यात बिळात पाणी गेल्याने साप बाहेर येतात. तसेच ते भक्षाच्याही शोधात असतात. घरातही स्वच्छता असावी. साप घरात येऊ नये  यासाठी उपाय योजना करावी. पुरेशी खबरदारी घ्यावी.
– तुषार गोसावी, सर्पमित्र

हेही वाचा

The post राहत्या घरात कोब्रा जातीच्या नागाची ५ पिल्ले! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण appeared first on पुढारी.