नाशिक : निवासी शाळा होणार आता ‘मॉडेल स्कूल’

मॉडेल स्कूल,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

समाजकल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळा आदर्श होण्यासाठी विभागाने पुढाकार घेतला असून, या शाळा आदर्श करण्याबरोबरच राज्यातील खासगी शाळांच्या धर्तीवर ‘मॉडेल स्कूल’ म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. पुण्यात नुकताच निवासी शाळांमधील पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा गौरव समारंभ व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात मॉडेल स्कूलच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून राज्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या निवासी शाळांतील शिक्षक, मुख्याध्यापक यांचा नुकताच विभागीय स्तरावर सन्मान करण्यात आला होता. या सर्व पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासाठी तीन दिवसांची ‘फुलेवाडा शैक्षणिक कार्यशाळा’ समाजकल्याण आयुक्तालय पुणे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. राज्यातील ४५ जणांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्यात नाशिक विभागातील दोन मुख्याध्यापक व पाच शिक्षकांना समावेश आहे.

या कार्यशाळेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाळांचे केलेल्या कार्याचे सादरीकरण करण्यात येऊन इतर शाळांमध्येदेखील कशा पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येईल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, दिल्ली शासनाच्या धर्तीवर समाजकल्याण विभागाच्या निवासी शाळादेखील सीबीएससी अभ्यासक्रम राबवून आदर्श करण्यासाठी सर्वांनी उपाययोजना कराव्यात. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मॉडेल स्कूल निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे आयुक्त डॉ. नारनवरे यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिक : निवासी शाळा होणार आता 'मॉडेल स्कूल' appeared first on पुढारी.