नाशिक पदवीधर निवडणूक- सत्यजित तांबे यांना काँग्रेस पाठिंबा देणार नाही- नाना पटोले

Nashik MLC Election

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (Nashik MLC Election) गुरुवारी (दि. १२) अर्ज दाखल करण्याच्या अखरेच्या दिवशी ट्विस्ट पाहायला मिळाला. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी पुत्र सत्यजित यांच्या प्रेमापोटी अखेरच्या क्षणी निवडणुकीतून माघार घेतली. सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपने अखेरपर्यंत उमेदवार न दिल्याने तांबेंच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.

या राजकीय घडामोडींवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्यजित तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही, असे पटोले यांनी जाहीर केले आहे. काँग्रेसमधील बंडखोर उमेदवाराला काँग्रेस कधीही पाठिंबा देणार नाही. तांबे यांच्या बंडखोरीविषयी हायकमांडला सर्व अहवाल देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हायकमांडच्या निर्देशानुसार पुढील पाऊल उचलणार आहे. भाजपचे भय दाखवून घरे फोडण्याचे काम सुरु आहे. ज्या दिवशी भाजपचं घर फुटेल त्यावेळी दुसऱ्याचं घर फोडण्याचे काय दुःख असते हे भाजपला कळेल, अशा शब्दांत नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. विभागीय महसूल आयुक्तालयात दिवसभरात २० उमेदवारांचे एकूण ३१ अर्ज प्रशासनाकडे दाखल झाले असले, तरी चर्चा मात्र तांबे पिता-पुत्राच्या अर्ज भरण्यावरूनच रंगली होती. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. तांबे यांनी त्यांच्याकडे पक्षाचा ‘एबी’ फॉर्म असूनदेखील अंतिम क्षणापर्यंत अर्ज दाखल केला नाही. त्यांचे पुत्र सत्यजित यांनी काँग्रेस व अपक्ष म्हणून दोन अर्ज दाखल केले असले, तरी त्यांच्याकडे पक्षाचा अधिकृत ‘एबी’ फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज अपक्ष असेल. मात्र, या सर्व घडामोडीत गाफील राहिलेल्या काँग्रेससाठी ही धक्कादायक बाब आहे. दुसरीकडे, उमेदवारावरून अखेरपर्यंत भाजपनेही त्यांचे पत्ते उघड केलेले नाहीत. निवडणुकीत नगरमधील राजेंद्र विखे-पाटील यांचे नाव आघाडीवर असले, तरी ते फक्त चर्चेपुरते मर्यादित ठेवण्यात भाजप यशस्वी ठरला.

देवेंद्र फडणवीसांनी थोरातांना आधीच दिला होता सूचक इशारा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्याबाबत बाळासाहेब थोरात यांना गेल्या महिन्यातच सूचक इशारा दिला होता. सत्यजित तांबे यांनी आपल्या सिटिझन विल या पुस्तकाचे प्रकाशन फडणवीस यांच्या उपस्थित पार पाडले. फडणवीस यांनी बोलताना बाळासाहेब थोरात यांना उद्देशून सत्यजित तांबे यांना अजून किती दिवस सभागृहाच्या बाहेर ठेवणार? असा सवाल केला होता. आमच्यासारख्यांचा अशा चांगल्या नेत्यांवर डोळा असतो. चांगली माणसे जमवावीच लागतात, असे फडणवीस म्हणाले होते. (Nashik MLC Election)

हे ही वाचा :

The post नाशिक पदवीधर निवडणूक- सत्यजित तांबे यांना काँग्रेस पाठिंबा देणार नाही- नाना पटोले appeared first on पुढारी.