नाशिक: पहिल्या फेरीत 9,462 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

ॲडमिशन www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अकरावी प्रवेशाच्या केंद्रिभूत प्रवेशप्रक्रियेंतर्गत शनिवारी (दि.6) संपलेल्या पहिल्या फेरीच्या मुदतीत सायंकाळी 4 पर्यंत नाशिक महापालिका क्षेत्रातील 63 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नऊ हजार 462 जागांवर प्रवेश निश्चित झाले. त्यामध्ये कोट्याच्या एक हजार 13, तर कॅपच्या आठ हजार 449 प्रवेशांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत पंसतीचे महाविद्यालय मिळाले नसल्याने, तीन हजार 161 विद्यार्थ्यांनी दुसर्‍या फेरीस पसंती दिली आहे.

शहरातील 63 कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीच्या 26 हजार 480 जागांसाठी ऑनलाइन केंद्रिभूत पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिल्या फेरीसाठी 12 हजार 623 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात आली. त्यामध्ये कला शाखेतील 2 हजार 81, वाणिज्य शाखेच्या 4 हजार 218, विज्ञान शाखेच्या 6 हजार 177 तर, एचएसव्हीसी शाखेच्या 147 विद्यार्थ्यांचा समावेश होता. दरम्यान, शिक्षण संचालनालयाकडून दुसर्‍या फेरीचे वेळापत्रक जारी करण्यात आले असून, रविवारी (दि. 7) रिक्तपदांची माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. मंगळवारी (दि. 9) रात्री 10पर्यंत केंद्रीय प्रवेशासाठी भाग दोन अर्थात पसंतीक्रम, तर नवीन विद्यार्थ्यांना भाग एक भरता येणार आहे. तसेच यापूर्वीच्या फेरीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना द्विलक्षी विषय प्रवेशासाठी पसंती नोंदविता येणार आहे. शुक्रवारी (दि. 12) दुसर्‍या फेरीसाठी अलॉटमेंट जाहीर होणार आहे, तर पात्र विद्यार्थ्यांना 17 ऑगस्टपर्यंत अर्ज निश्चित करावे लागणार आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक: पहिल्या फेरीत 9,462 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित appeared first on पुढारी.