नाशिक : पाथरेत एकाच रात्री सहा घरफोड्या; संपता संपेना चोर्‍यांचे सत्र

घरफोडी www.pudhari.news

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा
पाथरे येथील पोहेगाव व देर्डा रस्त्यालगत वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी बुधवारी (दि. 23) मध्यरात्री सहा ठिकाणी घरफोड्या केल्या. या चोर्‍यांमध्ये साधारणपणे साडेचार ते पाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची माहिती आहे. सिन्नर तालुक्यातील घरफोड्यांचे सत्र संपत नसल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. पोलिसांच्या कामगिरीवरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सध्या पावसाने उघडीप दिल्याने दिवसभर शेतात काबाडकष्ट करून रात्री निद्राधिन झालेल्या शेतकर्‍यांना सकाळपर्यंत आपल्या घरी चोरी झाल्याचा सुगावाही लागला नव्हता. पहाटे पाचच्या दरम्यान नेहमीप्रमाणे झोपेतून उठल्यानंतर चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. सुखदेव मारुती गुंजाळ, मच्छिंद्र कचरू बारहाते, रामनाथ लक्ष्मण बारहाते, नारायण यादव पाचोरे या पोहेगाव रस्त्यालगत असलेल्या शेतकर्‍यांच्या तर देर्डा रस्त्यालगत असलेल्या साहेबराव दामोदर रहाणे व नारायण माधव चिने यांच्या वस्तीवर घरफोड्या झाल्या आहेत. मच्छिंद्र कचरू बारहाते यांच्या घरासमोरील लोखंडी दरवाजा तोडून चोरांनी घरात प्रवेश करत तीन हजार रुपयांची रोकड, दोन मोबाइल व देवाची तांब्याची भांडी पळवली. शेजारी रामनाथ लक्ष्मण बारहाते यांच्या घरातून दोन अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल व दहा हजारांची रोकड लांबवली. सुखदेव मारुती गुंजाळ यांचा अठरा हजार रुपये किमतीचा अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल, शासकीय कागदपत्रांची फाइल, सव्वा तोळ्याचे सोन्याचे दागिने, सहा भार चांदीचे घड्याळ, 4800 रुपयांची रोकड व मुलांचे दप्तर चोरट्यांनी लंपास केले. दरम्यान, वावी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास सुरू केला आहे.

पूर्व भागात पंधरा दिवसांत दोनदा चोर्‍या : 
सध्या चोरट्यांची दहशत चांगलीच वाढली आहे. पंधरा-वीस दिवसांपूर्वी सिन्नर-शिर्डी महामार्गावर असाच प्रकार घडून वाहनचालकांना लुटण्याचा प्रकार घडला आहे. दोनच दिवसांपूर्वी कहांडळवाडी येथे एकाच रात्री तीन घरफोड्यांची घटना ताजी असताना पुन्हा पाथरे येथे चोरीचे प्रकार घडल्यामुळे चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांसमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे.

चोरीच्या दुचाकीचा वापर :
नारायण यादव पाचोरे यांच्या घराच्या दुसर्‍या मजल्यावर प्रवेश करत चोरट्यांनी तीन हजार रुपयांची रोकड व चारचाकी गाडीची कागदपत्रे पळविले. विशेष म्हणजे चोरटे लोखंडी अँगलला साडी बांधून खाली उतरले. यानंतर चोरट्यांनी साहेबराव दामोदर राहणे यांच्या घराकडे मोर्चा वळवला. घरातील भांड्यांचा आवाज ऐकून महिलेला जाग आल्याने इथून चोरट्यांनी पोबारा केला व जवळच असलेल्या नारायण मारुती चिने यांच्या घरासमोरील पॅशन प्रो मोटरसायकल (एमएच 17 एएम 5660) पळवून नेली व सुखदेव पाचोरे यांच्या वस्तीवर चोरून आणलेली मोटारसायकल तशीच सोडून पोबारा केला. सदर सोडून गेलेल्या मोटरसायकलवर चारचाकी वाहनाची नंबरप्लेट असल्याचे समजते.

हेही वाचा:

The post नाशिक : पाथरेत एकाच रात्री सहा घरफोड्या; संपता संपेना चोर्‍यांचे सत्र appeared first on पुढारी.