नाशिक: पैसे, दागिन्यांसह पसार झालेल्या नववधूला अटक; दुसर्‍या लग्नाचा डाव उधळला

malegaon

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा: ‘शेतकरी नवरा नको गं बाई’, या प्रवृत्तीमुळे वधू शोध मोहिमेत निराश झालेल्या लग्नाळू तरुणांना फसविणारी टोळी मालेगाव तालुका पोलिसांच्या हाती लागली आहे. हातावरील मेहंदीचा रंग उतरण्याआधीच पसार होणार्‍या ‘त्या’ वधूला दुसर्‍यांदा बोहल्यावर चढण्यापूर्वीच पकडण्यात आल्याने एका तरुणाची फसवणूक होता होता वाचली. विशेष म्हणजे, या ‘बबली’कडे दोन आधार कार्ड असल्याने तिची खरी ओळख शोधण्याचे आव्हान (Nashik News) आहे.

मालेगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवी मगर यांनी सोमवारी (दि.10) पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची माहिती दिली. मुलाकडे शेतीवाडी हवी मात्र, तो शेतकरी नव्हे, तर नोकरी-धंदा करणाराच हवा, या मानसिकतेमुळे अनेक शेतकरी तरुणांचे लग्न जुळत नाही. ग्रामीण भागात हा प्रश्‍न ज्वलंत होत आहे. तर, अशा मुलांची लग्न जुळवून देण्याचा धंदाही झाला आहे. त्यातून अनेकांना अपयश येते, तेव्हा अशा तरुणांना गंडविणारी टोळी सक्रीय झाल्याचे वेगवेगळ्या प्रकरणांमधून उघडकीस आले आहे. असाच प्रकार दाभाडीतील तरुणाच्या बाबतीत (Nashik News) घडला.

दसाने गावात लग्न सोहळ्यासाठी गेलेल्या पाहुण्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. ते जेव्हा कार्यक्रमस्थळी पोहोचले. तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण बोहल्यावर चढणार्‍या नववधूचे तीन महिन्यापूर्वीच दाभाडीतील एका तरुणाशी लग्न झाले होते. त्यांनी वेळ न दवडता तत्काळ त्या तरुणाला कळवले. त्या तरुणाने ही तत्काळ तालुका पोलिस ठाणे गाठत हरवलेल्या पत्नीचा शोध घेत असताना ‘ती’ दुसर्‍या तरुणासोबत लग्न करत असल्याची तक्रार केली. पोलिसांनी तपास करीत लग्नाचा बाजार मांडलेल्या त्या तरुणाला ताब्यात घेतले. तिला न्यायालयासमोर उभे केले असता 14 जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, या तरुणीकडे दोन आधारकार्ड मिळून आले. ते दोन्ही आधारकार्ड खोटे की त्यातील एक खरे, याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. या तरुणीने इतरही तरुणांना गंडा घातला असल्याची शक्यता असल्याने पीडित तरुणांनी तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक मगर यांनी केले आहे.

Nashik News : अडीच लाख अन् 90 हजाराची रोकड घेऊन पसार

दाभाडी येथील शेतकरी तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, नाशिक व नगरमधील दोन महिला आणि दोन पुरुष दलालांनी त्याच्याशी संपर्क साधत लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार अडीच लाखाच्या मोबदल्यात योग्य तरुणी दाखविण्यात आली. लग्नही झाले. मुलाने बायकोला 80 हजार रुपयांचे दागिने दिले. परंतु, 1 एप्रिल 2023 रोजी ही नववधू दागिने आणि घरातील 10 हजार रुपयांची रोकड घेऊन पसार झाली. त्याने तिचा खूप शोध घेतला, मात्र हाती काही लागले नाही. आणि पुन्हा दुसर्‍या मुलाशी लग्न करताना सापडल्याने त्याने फसवणुकीची तक्रार दिली आहे. पोलिस आता त्या दलालांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा 

The post नाशिक: पैसे, दागिन्यांसह पसार झालेल्या नववधूला अटक; दुसर्‍या लग्नाचा डाव उधळला appeared first on पुढारी.