नाशिक : बाजार समितीसाठी पहिल्या दिवशी एकच अर्ज

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार (दि. 27)पासून प्रारंभ झाला. ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात असून, अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एक अर्ज जमा करण्यात आला. ग्रामपंचायत- सर्वसाधारण मतदारसंघातून गिरणारे येथील तानाजी निवृत्ती गायकर यांनी पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला.

किमान 10 गुंठे जमीन असेल आणि शेतकरी असल्याचा पुरावा असेल, तरच शेतकरी उमेदवारांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. निडणुकीसाठी सहकारी संस्था प्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी, आडते व मापारी मतदारसंघ तसेच हमाल व मापारी मतदारसंघ यातून उमेदवारी अर्ज दाखल केले जातात. शेतकरी म्हणून उमेदवारी करणार्‍यांकडे किमान 10 आर. जमीन असली पाहिजे, शेतकरी व बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी व शेतकरी असल्याबाबतचा संबंधित गावच्या तलाठ्यांचा दाखलादेखील बंधनकारक करण्यात आला आहे. व्यापारी, हमाल व तोलारी मतदारसंघासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना, अनुज्ञप्ती, लायसेन्स यापैकी एकाची स्वसाक्षांकित प्रत सादर करावी लागेल. उमेदवारांना 3 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे कामकाज पाहात आहेत. उमेदवारांनी अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा एक फोटो (सर्वांसाठी), आधारकार्डची स्वसाक्षांकित प्रत (सर्वांसाठी), प्रतिज्ञापत्र, तलाठी यांचा रहिवासी दाखला (सर्वांसाठी), जात प्रमाणपत्राची स्वसाक्षांकित प्रत (राखीव प्रवर्गासाठी), जातवैधता प्रमाणपत्राची स्वसाक्षांकित प्रत (राखीव प्रवर्गासाठी), कोणतीही थकबाकी नसल्याबाबत बाजार समिती सचिवांचा दाखला (सर्वांसाठी), तहसीलदार यांनी दिलेले आर्थिक दुर्बल घटक असल्याचे प्रमाणपत्र व घोषणापत्र (आर्थिक दुर्बल घटकासाठी), किमान 10 आर जमीन धारण असलेला अद्ययावत 7/12 उतारा (फक्त शेतकरी उमेदवारासाठी); शेतकरी व बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी व शेतकरी असल्याबाबत संबंधित गावाच्या तलाठी यांचा दाखला, व्यापारी, हमाल व तोलारी मतदारसंघासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना / अनुज्ञप्ती / लायसंन्सची स्वसाक्षांकित प्रत, अनामत रकमेची मूळ पावती जोडावी, असे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : बाजार समितीसाठी पहिल्या दिवशी एकच अर्ज appeared first on पुढारी.