नाशिक : भारत कोकाटे यांच्या विजयाने वाजे-सांगळे गटाला पुन्हा ‘बूस्टर’

कोकाटे www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : संदीप भोर
नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालकपदी सोमठाणेचे सरपंच भारत कोकाटे अटीतटीच्या लढतीत दोन मतांनी विजयी झाले. 12 ग्रामपंचायतींपाठोपाठ या निवडणुकीतही आमदार माणिकराव कोकाटे गटाला धक्का बसला आहे. या विजयाचा माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांच्या गटाला बूस्टर मिळाला असल्याचे दिसत आहे. समर्थकांनी सोमवारी (दि.26) या विजयाचा जल्लोष केला.

तालुक्यातील एकूण 63 मतदारांपैकी 62 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला व एक मत बाद झाले. वाजे-सांगळे गटात असलेले भारत कोकाटे यांनी32 मते मिळवून यश मिळविले. आमदार कोकाटे यांचे समर्थक आणि गेल्या 20 वर्षांपासून मजूर फेडरेशनमध्ये पाय रोवून उभे असलेले दिनकर उगले यांचा पराभव झाला आहे. त्यांना 30 मते मिळाली. वाजे-सांगळे यांच्याबरोबरीने फेडरेशनचे माजी चेअरमन बंडूनाना भाबड यांनीही कामगिरी बजावली. ही निवडणूक तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. त्याचे कारण असे, आमदार कोकाटे व भारत कोकाटे या बंधूद्वयींमध्ये गेल्या काही वर्षात सूत जुळत नाही. परिणामी ते विरोधकांच्या गोटात सामील झालेले आहे. आणि आमदार कोकाटे यांनी दिनकर उगले यांना उमेदवारी दिली होती. दिनू उगले हे 21 वर्षापासून संचालक असून तीन वेळेस चेअरमन झाले आहेत. सोमठाण्याचे सरपंच भारत कोकाटे यांनी यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यामुळे त्यांना माजी आमदार वाजे व सांगळे यांचे पाठबळ लाभले. आमदार कोकाटे यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. त्यांचे तिसरे बंधू विजय कोकाटे यांनीही भारत कोकाटे यांच्या विजयासाठी परिश्रम घेतले. या निवडणुकीतून माजी आमदार वाजे व युवा नेते सांगळे यांच्या एकीचे बळ दिसून आले. विशेष म्हणजे या निवडणुकीअगोद आमदार समर्थक उगले यांनी तीन-चार गटात मतदारांना सहलीला नेलेले होते. ती संख्या 31 होती. त्यांचेच तीन समर्थक वेगवेगळ्या कारणांनी बाहेरगावी गेलेले नव्हते. तर भारत यांच्यासोबत 24 मतदार सहलीवर होते. त्यामुळे उगले यांचे पारडे जड असतानाही पराभव पत्करावा लागल्याने आमदार गट आश्चर्यचकीत झाला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : भारत कोकाटे यांच्या विजयाने वाजे-सांगळे गटाला पुन्हा ‘बूस्टर’ appeared first on पुढारी.