नाशिक : भावाची बहिणीला लाखमोलाची ओवाळणी

रक्षाबंधन www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तब्बल दोन वर्षांनंतर अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरा केल्या गेलेल्या रक्षाबंधन या सणानिमित्त सराफ बाजारालाही मोठी झळाळी मिळाली. यावेळी भावाने बहिणीला ओवाळणी म्हणून सोने-चांदीच्या अलंकाराचे गिफ्ट देणे पसंत केले. यावेळी सराफ व्यावसायिकांनीदेखील सोने-चांदीचे वेगवेगळे आकर्षक गिफ्ट उपलब्ध करून दिले होते.

रक्षाबंधनानंतर लगेचच हरितालिका असल्याने, सराफ बाजारात तेजीचे वातावरण आहे. पंधरा दिवसांपूर्वी 57 हजार रुपये प्रतिकिलो असलेली चांदी मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी 60 हजारांपर्यंत गेली. तर सोन्याचे दर 50 हजार 700 प्रतितोळा होते. आषाढी एकादशीनंतर लग्नसराई बंद झाल्याने सोने-चांदीला हौसेखातर घेणार्‍या व्यतिरिक्त मागणी नव्हती. यामुळे सोने-चांदी बाजारात शांतता होती. जुलैत चांदीच्या दरात साडेपाच हजारांची, तर सोन्याच्या दरात पाचशे रुपयांची घसरण झाली होती. रक्षाबंधनाचे निमित्त साधून अनेक गुंतवणूकदारांनी सोने-चांदीच्या दरात गुंतवणूक करीत सोने-चांदीची खरेदी केली. रशिया व युक्रेनमधील युद्धामुळे फेब्रुवारीत सोने-चांदीच्या दरात सातत्याने 8 मार्चपर्यंत वाढ होत गेली. नंतर मात्र युद्धात शिथिलता येताच सोने-चांदीच्या दरात घसरण सुरू झाली होती. यंदाही आषाढी एकादशीनंतर सोने-चांदीच्या दरात घसरण झाली. गेल्या पंधरवड्यात मात्र या दरात वाढ झाल्याने सोने- चांदीला झळाळी येत आहे. दरम्यान, रक्षाबंधनानिमित्त व्यावसायिकांनी राख्यांसह वेगवेगळे गिफ्ट उपलब्ध करून दिले होते. त्यामध्ये देवांच्या मूर्ती, पिंपळाचे पान, लॉकेट आदी गिफ्टसाठी वस्तू उपलब्ध करून दिल्या होत्या. त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून आले.

घरपोच डिलिव्हरी : अनेक व्यावसायिकांनी ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिली होती. ज्या ग्राहकांनी ऑनलाइन वस्तू बुक केली, त्याला घरपोच डिलिव्हरी दिली जात होती. त्यामुळे ग्राहकांना घरबसल्या आपल्या लाडक्या बहिणीसाठी गिफ्ट खरेदी करता आले.

हेही वाचा:

The post नाशिक : भावाची बहिणीला लाखमोलाची ओवाळणी appeared first on पुढारी.