नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
मखमलाबाद लिंक रोडवरील समर्थनगर जवळील मोकळ्या जागेत खून झालेल्या अवस्थेत आढळलेल्या अनोळखी तरुणाची ओळख पटविण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. ऋषिकेश दिनकर भालेराव (१९, रा. धर्माजी कॉलनी, सातपूर, नाशिक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मारेकऱ्यांना शोधण्याचे आव्हान पंचवटी पोलिसांसमोर आहे.
हमालवाडीजवळील पाटालगत शनिवारी (दि. २०) सकाळी एका तरुणाचा चेहरा दगडाने ठेचून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. झोन एकचे पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त सीताराम गायकवाड, पंचवटी पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डाॅ. सीताराम काेल्हे, पोलिस निरीक्षक युवराज पत्की आदींसह गुन्हे शाखा युनिट एक व दाेन तसेच मध्यवर्ती गुन्हे शाखेचे आधिकारी दाखल झाले. पाेलिसांनी पाहणी करून पंचनामा करत मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला होता. तपास सुरू असताना पोलिसांनी बेपत्ता नोंदीचा तपास केला. तेव्हा ऋषिकेश बेपत्ता असल्याचे शनिवारी रात्री उशिरा आढळून आले. पोलिसांनी त्याच्या नातलगांना बोलावून घेत मृतदेह दाखविला. तेव्हा मृतदेहाची ओळख पटली असून, आता खुन्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे कायम आहे.
सातपूरच्या कंपनीतील कामगार
सातपूर येथील एका कंपनीत कंत्राटी म्हणून ऋषिकेश कामाला होता. कामातही त्याचे जास्त लक्ष नव्हते. त्याला विविध प्रकारच्या नशा करण्याचे व्यसन जडले असल्याचे समजते. त्याची पार्श्वभूमी सामान्य असल्याचे समोर येते आहे. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात अनोळखी मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांची चौकशी सुरू
पोलिसांना मृत ऋषिकेशची ओळख पटल्याने त्याची हत्या कुणी व का केली असेल, शिवाय तो सातपूरचा रहिवासी असताना इकडे मखमलाबाद रोडवर त्याचा मृतदेह कसा, असे अनेक प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत. याचा तपास आता सुरू झाला आहे. त्यामुळे त्याच्याशी निगडित ओळखीचे तसेच अन्य संशयितांची चौकशी सुरू आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक युवराज पत्की करीत आहेत.
हेही वाचा:
- नगर : मॉलमधून आयफोन, स्मार्टवॉच, हेडफोन चोरी
- नगर : थेंबा थेंबानं पिकं झाली हिरवीगार..!
- मावळ्यांच्या मदतीने मिळाले युवकाला जीवदान; राजगडाच्या पाऊलवाटेवर उडी मारताना गंभीर जखमी
The post नाशिक : मखमलाबाद रोडवरील "त्या" मृतदेहाची ओळख पटली appeared first on पुढारी.