नाशिक : मनपा रुग्णालयांना मिळेना डॉक्टर

डॉक्टर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सुरू केलेली ४५ डॉक्टरांची मानधनावरील भरती नूतन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रद्द केल्याने अवघ्या ६५ डॉक्टरांवरच महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचा संपूर्ण कारभार सुरू आहे. मनपाच्या नवीन बिटको रुग्णालयातील आंतर आणि बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. परंतु, या रुग्णालयाला मनुष्यबळ मिळेनासे झाले आहे.

महापालिकेत १८९ इतक्या डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. मात्र, त्यापैकी आजमितीस केवळ ६५ डॉक्टरांवरच मनपा रुग्णालये तसेच शहरी आरोग्य केंद्रांचा भार आहे. अनेक ठिकाणच्या मनपा रुग्णालयांना तर डॉक्टरच नसल्याने रुग्णांच्या जिवाशीदेखील खेळ सुरू असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे. कोरोना महामारीसह इतरही आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्याने कायमस्वरूपी नाही तर किमान कंत्राटी डॉक्टरांची भरती करण्यासाठी मनपा प्रशासनाने निर्णय घेतला. त्यानुसार कोरोना काळात मनपाने कंत्राटी डॉक्टर्स तसेच इतर आरोग्य, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती केली. कोरोनाची दुसरी लाट ओसरली आणि तिसरी लाट सौम्य ठरल्याने मनपाने कंत्राटी डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला. कोरोनानंतर बिटको रुग्णालय इतर रुग्णांसाठी खुले करण्यात आले. त्यानुसार त्या ठिकाणी बाह्य व आंतर रुग्ण विभाग सुरू करण्यात आला. तसेच सीटी स्कॅन, एक्स-रे विभाग, स्त्रीरोग विभाग, शस्त्रक्रिया विभाग यासह इतरही विभाग सुरू करण्यात आल्याने मनुष्यबळाची कमतरता भासू नये, यासाठी ४५ डॉक्टरांची मानधनावर दीड महिन्यापूर्वी भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मागील जुलै महिन्यात थेट मुलाखती घेण्यात आल्या. एकूण ९० उमेदवारांनी मुलाखती दिल्या. या मुलाखतीतून ४१ डॉक्टरांनी काम करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार रुजू होण्याचे आदेश देणार तोच ही फाइल नूतन आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार यांनी मागवून घेतली आणि संबंधित भरतीप्रक्रिया रोष्टर पद्धतीने न झाल्याने रद्द करत भरती नव्याने रोष्टर पद्धतीने करण्याचे निर्देश दिले. परंतु, गेल्या दीड महिन्यापासून या भरतीबाबत आस्थापना विभाग आणि वैद्यकीय विभाग यांच्यात केवळ पत्रव्यवहारच सुरू आहे. महापालिकेची सेवाप्रवेश नियमावली मंजूर नसल्याने भरती कशी करणार असा प्रश्न प्रशासन विभागाकडून केला जात आहे. त्यामुळे एकूणच कंत्राटी भरतीप्रक्रिया देखील मनपाच्या लालफितीत अडकली आहे.

डॉक्टरांची १२४ पदे रिक्त

महापालिकेच्या वैद्यकीय विभागात विशेष तज्ज्ञांसह डॉक्टरांची १८९ पदे मंजूर आहेत. सध्या ६५ डॉक्टर कार्यरत आहेत. १२४ पदे रिक्त असून, त्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ६१ पदे, वैद्यकीय अधीक्षक – ४, फिजीशियन आठ, स्त्रीरोग तज्ज्ञ-१६, बालरोगतज्ज्ञ -१६, भूलतज्ज्ञ- नऊ, सर्जन ८, अस्थिव्यंग तज्ज्ञ – ४, कान, नाक, घसा तज्ज्ञ- ४, नेत्र शल्यचिकित्सक – ४ अशी रिक्त पदे आहेत. मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असूनही त्याचे गांभीर्य ना मनपा प्रशासनाला आहे ना वैद्यकीय व प्रशासन विभागाला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : मनपा रुग्णालयांना मिळेना डॉक्टर appeared first on पुढारी.