नाशिक : मनपा विद्यार्थ्यांचा आजादी का अमृतमहोत्सव शालेय गणवेशाविनाच!

शाळा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटूनही महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मिळू शकलेले नाही. येत्या 9 ते 15 ऑगस्टपर्यंत आजादी का अमृत महोत्सव सुरू होत असून, महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांना मनपा विद्यार्थ्यांना जुन्या किंवा साध्या गणवेशातच जावे लागणार आहे.

कोरोनानंतर या शैक्षणिक वर्षापासून शासकीय तसेच खासगी शालेय सत्र सुरळीत सुरू झाले आहे. त्याला जवळपास दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी झाला आहे. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि गणवेश तत्काळ मिळाले पाहिजे. कारण त्यासाठी आर्थिक तरतूद मनपाकडून केली जाते. परंतु, फायलींच्या ससेमिर्‍यात विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे भानही सरकारी अधिकार्‍यांना राहत नाही. मनपाकडून विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन गणवेश दिले जातात. परंतु, अद्यापही गणवेश मिळालेले नाहीत. गणवेश खरेदीबाबत शिक्षण विभागाने सादर केलेल्या प्रस्तावात लेखा व वित्त आणि लेखापरीक्षण विभागाकडून वारंवार चुकांवर बोट ठेवले जात असल्याने गणवेश मिळण्याचा मार्गात खोळंबा निर्माण झाला आहे. मनपा शाळेत 30 हजार 523 विद्यार्थी शिक्षण घेतात. पहिली ते आठवीच्या वर्गात 20 हजार 38 विद्यार्थी आहेत. माध्यमिक विभागाच्या सहावी ते दहावीच्या वर्गात 3 हजार 27 विद्यार्थी आहेत. तर खुला व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील 7 हजार 458 विद्यार्थी आहेत. यातील अनुसूचित जाती व जमातीच्या 20 हजार 38 विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानातून गणवेश प्राप्त होतो. उर्वरित गणवेश महापालिकेकडून स्वखर्चाने दिला जातो. एका गणवेशासाठी 300 रुपये खर्च येतो.

विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबतची माहिती मुख्याध्यापकांकडून मागविण्यात आली असून, ती संबंधित विभागाला दिली जाणार आहे. यासंदर्भातील अहवाल मुख्याध्यापकांकडून मागविण्यात आला आहे. 8 ऑगस्टपर्यंत गणवेश वितरित करण्याची सूचना केली आहे. – सुनीता धनगर, शिक्षणाधिकारी, मनपा

हेही वाचा:

The post नाशिक : मनपा विद्यार्थ्यांचा आजादी का अमृतमहोत्सव शालेय गणवेशाविनाच! appeared first on पुढारी.