नाशिक : महानगरपालिकेच्या मुख्यालयात ढोल-ताशांच्या गजरात आसमंत निनादला

जागर www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत स्वराज्य महोत्सवामध्ये नाशिक महापालिकेतर्फे मंगळवारी (दि.९) महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ढोल-ताशांच्या गजराने तसेच एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या देशभक्तीपर गीतांनी आसमंत निनादून उठला.

शिवताल ढोल-ताशा पथकाने आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अतिशय लयबद्ध आणि जोशपूर्ण सादरीकरणामुळे पथकातील सदस्यांना मोठी दाद मिळाली. एसव्हीकेटी, एचपीटी, बीवायके या महाविद्यालयांतील एनसीसी कॅडेट्सनेही देशभक्तीपर विविध गाणी सादर केली. त्यातून देशभक्तीची लहर उमटली. महापालिकेचे कार्यकारी अभियंता रवि बागूल आणि कर्मचारी गुणवंत वाघ यांनीही देशभक्तीपर गाणे सादर केले. या कार्यक्रमानंतर महापालिकेच्या सर्व अधिका-यांच्या उपस्थितीत नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. महापालिका मुख्यालयापासून कॅनडा कॉर्नर, शरणपूर पोलिस चौकी, मायको सर्कल अशा मार्गाने पुढे गोल्फ क्लबला रॅलीचा समारोप झाला. ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाच्या जनजागृतीसाठी ७५ सायकलिस्टने रॅलीत सहभाग घेतला होता. सायकल रॅलीच्या पाठोपाठ जिपची थार रॅलीही निघाली. टॉर्क आरपीएम १५ आणि ग्रेपसिटी ऑफ रोड या ग्रुपने थार रॅलीत सहभाग घेतला होता. लायन्स क्लब नाशिक मेट्रोचे पदाधिकारी, शिवताल ढोल-ताशा पथकाचे नारायण जाधव, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, थार रॅलीत सहभागी ग्रुपचे हर्षद कडभाने तसेच सुभेदार हरीश वानिया, सुभेदार चैनसिंह राजपुरोहित या सर्वांचा सत्कार अतिरिक्त आयु्क्त अशोक आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला. सेवासाधना फाउंडेशनचे दीपक भगत, राम कदम, रुपेश पाटील, कल्पेश खाडे यावेळी उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम यांनी सूत्रसंचालन केले.

मुख्यालयाचे सौंदर्य खुलले

अमृत महोत्सवानिमित्त १७ ऑगस्टपर्यंत असे विविध कार्य़क्रम आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहेत. महापालिकेच्या मुख्य इमारतीला विद्युत रोषणाई आणि मुख्य दरवाजाला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. नववर्ष स्वागत समितीच्या सदस्यांनी काढलेल्या विविधरंगी आकर्षक रांगोळीने मनपा मुख्यालयाचे सौंदर्य आणखीन खुलले असून, ध्वजस्तंभ आणि परिसरही फुलांनी सजवला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : महानगरपालिकेच्या मुख्यालयात ढोल-ताशांच्या गजरात आसमंत निनादला appeared first on पुढारी.