नाशिक महापालिकेच्या वेबसाइटवर पुन्हा सायबर हल्ला

Cyber attack

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महापालिकेच्या अधिकृत www.nmc.gov.in या वेबसाइटवर पुन्हा सायबरहल्ला झाल्याची बाब शुक्रवारी (दि. २१) उघड झाली. बँक, शासकीय संस्था नेहमीच हॅकर्सच्या रडारवर असतात. तांत्रिक चुका, वेबसाइट वापराबाबत पुरेशी काळजी न घेणे यामुळे या वेबसाइटवर हॅकर्सना सहज हल्ला करता येतो. महापालिकेच्या वेबसाइटबाबतही असाच गाफीलपणा पाळला गेल्याने वेबसाइट हॅक केल्याची चर्चा यानिमित्त रंगली आहे. दरम्यान, हॅकर्सने वेबसाइट हॅक केल्याची इमेजसुद्धा अपलोड केली होती.

यापूर्वीदेखील नाशिक महापालिकेची वेबसाइट हॅक करण्यात आली आहे. यावेळी मात्र, हॅकर्सने संपूर्ण डेटाच हॅक केल्याची शक्यता आहे. वेबसाइट हॅक झाल्याचे समजताच मनपाच्या तांत्रिक विभागाने याची कारणमीमांसा करण्यास सुरुवात केली. वेबसाइट नेमकी कशी हॅक झाली, याचा पुरावा गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान, महापालिकेच्या वेबसाइटवर संवेदनशील आणि महत्त्वाची माहिती असून, त्याचा गैरवापर हॅकर्सने करू नये, अशी अपेक्षा आणि भीतीही आता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर वेबसाइटमधील त्रुटी नेमक्या काय आहेत, याची नियमित तपासणी करण्याबाबतही महापालिकेकडून ठोस उपाययोजना करण्याबाबतची पावले उचलली जात आहेत.

दोनदा सायबरहल्ला करून वेबसाइट हॅक झाली आहे. यावेळी वेबसाइट हॅक झाल्याचे समजताच महापालिकेच्या तांत्रिक विभागाने तत्काळ पावले उचलत दुपारपर्यंत वेबसाइट सुरळीत केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, डेटा रिकव्हर केला गेला काय? याबाबतची माहिती प्राप्त होऊ न शकल्याने वेबसाइटवरील टेंडर तसेच अन्य माहितीचा दुरुपयोग केला जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक महापालिकेच्या वेबसाइटवर पुन्हा सायबर हल्ला appeared first on पुढारी.