नाशिक : ‘माझी वसुंधरा’ अभियानात मनपा नवव्या स्थानी

नाशिक मनपा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य शासनातर्फे पर्यावरणाचे संवर्धन तसेच पंचतत्त्वावर आधारित २ ऑक्टोबर २०२० पासून सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाचे यंदाचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, त्यामध्ये नाशिक महापालिकेला नववे स्थान प्राप्त झाले आहे. पहिल्या वर्षी पाचवे स्थान पटकाविणाऱ्या नाशिक महापालिकेची दुसऱ्या वर्षी थेट २० व्या स्थानी घसरण झाली होती. आता त्यात काहीशी सुधारणा होऊन नववे स्थान मिळाले असले, तरी ते समाधानकारक नसल्याचे बोलले जात आहे.

पहिल्या वर्षी राज्यातील ४३ अमृत शहरे, २२२ नगर परिषदा, १३० नगरपंचायत व २९१ ग्रामपंचायती अशा एकूण ६८६ स्थानिक स्वराज्य संस्थांना यात सहभागी करून घेण्यात आले होते. पहिल्या वर्षी नाशिक महापालिका आणि बार्शी नगर परिषदेला विभागून पाचवे स्थान दिल्याने, महापालिकेला दीड कोटीचे बक्षीस प्राप्त झाले होते. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र, नाशिक महापालिकेची कामगिरी खूपच निराशाजनक राहिल्याने, थेट 20 वे स्थान मिळाले होते. यंदा 20 व्या स्थानावरून नवव्या स्थानी झेप घेतली आहे. महापालिकांच्या गटात पिंपरी चिंचवडने पहिला तर नवी मुंबई महापालिकेने दुसरे स्थान मिळवले. तर पुणे महापालिका तिसऱ्या स्थानी राहिली.

दरम्यान, या अभियानात नाशिक महापालिकेला ३ हजार ३१२ गुण प्राप्त झाले. नाशिकसह राज्यातील ४३ अमृत शहरे, ३६८ नगरपरिषद व नगरपंचायती, तसेच अकरा हजार ६२१ ग्रामपंचायती, अशा एकूण १६ हजार ८२४ स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियानात सहभाग नोंदविला होता. अमृत गटासाठी सात हजार ६००, तर अन्य गटांसाठी सात हजार ५०० गुण ठेवले होते.

पहिल्या टप्प्यात पाचवे स्थान मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात थेट 20 वे स्थान मिळाले होते. त्या तुलनेत यंदा नववे स्थान मिळाले आहे. मात्र, ही कामगिरी समाधानकारक नसल्याने पुढच्या वर्षी पहिले स्थान मिळवू असा विश्वास आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

-विजयकुमार मुंडे, उपआयुक्त, उद्यान विभाग.

वर्षभर भरगच्च उपक्रम

‘माझी वसुंधरा’ अभियानात पुढच्या वर्षी पहिले स्थान मिळवता यावे यासाठी नाशिक महापालिकेच्या उद्यान विभागाकडून वर्षभर भरगच्च उपक्रमांचे नियोजन केले आहे. त्यादृष्टीने शहरभर उपक्रम राबविले जात असून, त्याबाबतचा संपूर्ण अहवाल या अभियानांतर्गत पाठविण्यात येणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : 'माझी वसुंधरा' अभियानात मनपा नवव्या स्थानी appeared first on पुढारी.