नाशिक : माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप; मालधक्क्याचे कामकाज ठप्प

KAMGAR www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कामगार, गृह, पणन-सहकार, नगरविकास, महसूल आदी विभागांकडे माथाडी कामगारांच्या मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील माथाडी कामगारांनी गुरुवारी (दि.१) लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपात नाशिक जिल्ह्यातील सुमारे पाच हजार माथाडी कामगार सहभागी झाल्याने २० गोदामे, १७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज ठप्प झाले होते. तर नाशिकरोड येथील रेल्वेच्या मालधक्क्यावर संपाचा विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले.

बाजार समित्यांमधील माथाडी/मापाडी कामगारांची लेव्हीचा प्रश्न सोडवावा, शासन निर्णयानुसार खासगी बाजार समितीमधील माथाडी आनुषंगिक कामे बाजार समितीचे परवानेधारक व मंडळाच्या नोंदीत कामगारांना कामे मिळावीत, माथाडी/मापाडी कामगार भरतीबाबत कामगारविरोधी आदेश रद्द करावे, बाजार समितीमध्ये राजीनामा दिलेल्या माथाडी/मापाडी कामगारांच्या जागी नवीन कामगारास बाजार समितीचा परवाना घेणेबाबत येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात, शासकीय गोदामासंदर्भात सुधारित थेट वाहतूक पद्धतीमध्ये शासनाचे धोरण निश्चित करावे, नाशिकरोड रेल्वे मालधक्यावर प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यासह प्लॅटफॉर्मची दुरुस्ती करावी आदी मागण्या माथाडी कामगारांच्या आहेत. महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना देण्यात आले आहेत. यावेळी युनियनचे जिल्हा चिटणीस सुनील यादव, कृष्णराव जगदाळे, नारायण पोटे, रमेश पालवे, साहेबराव देवरे, संदीप साळे, रमेश जाधव, अनिल सोनवणे, विठ्ठल कुटे, नाना खरे, कैलास भालेराव, उज्ज्वल गुजराथी, उत्तम खांदे, श्रीराम जाधव, धनराज उगले, विश्वास सोनवणे, दत्ता पगारे, नामदेव काकविपुरे, सोमनाथ लभडे, भानुदास घोलप, भाऊसाहेब गोसावी आदी उपस्थित होते.

बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट
जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या, मालधक्के, शासकीय धान्य गोदाम व विविध आस्थापनांमधील हजारो माथाडी कामगार लाक्षणिक संपामध्ये सहभागी झाले होते. विशेषत: बाजार समित्यांमधील माथाडी कामगार मोठ्या संख्येने संपात उतरल्याचे चित्र बघावयास मिळाले. त्यामुळे बाजार समित्यांच्या आवारात शुकशुकाट दिसून आला.

हेही वाचा:

The post नाशिक : माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप; मालधक्क्याचे कामकाज ठप्प appeared first on पुढारी.