नाशिक : यापुढे बोगस प्रॅक्टिस करणार्‍या डॉक्टरांना बसणार चाप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात बोगस डॉक्टरांबाबत अनेक तक्रारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तालुका अधिकार्‍यांकडे वर्ग केल्या असल्या, तरी तालुकास्तरावरून एकाही तक्रारीचा अहवाल प्राप्त झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत दै. ‘पुढारी’ने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल या तक्रारींचा पाठपुरावा करणार असल्याचे समोर आले आहे. यामुळे बोगस प्रॅक्टिस करणार्‍यांना चाप बसणार आहे.

गेल्या दोन वर्षांत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात बोगस वैद्यकीय प्रॅक्टिस करणार्‍यांबाबत 23 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये इगतपुरी तालुक्यातील 7, नांदगाव तालुक्यातील 5, मालेगाव तालुक्यातील 3, सिन्नर आणि निफाड 2, तर दिंडोरी, बागलाण, नाशिक आणि नाशिक मनपा या ठिकाणाहून प्रत्येकी 1 आरोग्य विभागाने या तक्रारी तालुकास्तरावर वेळोवेळी पाठवून त्याबाबत काय कारवाई केली याबाबत अहवाल मागवला होता. मात्र, तालुकास्तरावरून गेल्या दोन वर्षांत एकही अहवाल प्राप्त झाला नव्हता आणि जिल्हा परिषदेने त्याबाबत संबंधित तालुका आरोग्य अधिकार्‍यांना स्मरणपत्र पाठविण्याची तसदी घेतली नव्हती. याबाबत दै. ‘पुढारी’ने विषय लावून धरत आता सीईओ यात लक्ष घालणार असल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अहवाल तयार केला आहे. बोगस डॉक्टरांच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षांसह त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी हे सदस्य सचिव, तर जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी आरोग्य हे सदस्य आहेत. ज्या नागरिकांना बोगस डॉक्टरांबाबत संशय येतो त्यांच्यामार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात येते.

एकाही डॉक्टरवर कारवाई नाही
तक्रार प्राप्त झाल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे वर्ग करून त्यावर काय कारवाई केली याबाबतचा अहवाल मागवला जातो. याबाबत बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे अधिकार या समितीला देण्यात आलेले आहेत. मात्र, अद्याप याबाबत एकाही बोगस डॉक्टरवर कारवाई झालेली नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : यापुढे बोगस प्रॅक्टिस करणार्‍या डॉक्टरांना बसणार चाप appeared first on पुढारी.