नाशिक : राज्यातील फेलोशिपपासून वंचित आदिवासी संशोधक विद्यार्थी नागपूरला धडकणार

फेलोशिप योजना www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील आदिवासी संशोधक विद्यार्थी पीएच.डी. संशोधन अधिछात्रवृत्ती अर्थात फेलोशिपपासून वंचित आहेत. फेलोशिपअभावी आदिवासी विद्यार्थ्यांचे पीएच.डी. मिळविण्याचे स्वप्न अपूर्ण राहात आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 15 डिसेंबरपर्यंत फेलोशिप योजनेची जाहिरात प्रसिद्ध न केल्यास आदिवासी संशोधक विद्यार्थी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहेत. सोमवार, दि. 19 डिसेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा आदिवासी संशोधक विद्यार्थी कृती समितीने दिला आहे.

महाराष्ट्रातील विविध नामांकित विद्यापीठांत दुर्गम-अतिदुर्गम भागांतील आदिवासी समाजातील विद्यार्थी पीएच.डी.चे शिक्षण घेत आहेत. मात्र, हे शिक्षण घेण्यासाठी येणारा खर्च पूर्ण करण्याची आर्थिक क्षमता ही संबंधित विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटुंबाची नाही. राज्य शासनाकडून फेलोशिप मिळत नसल्याने अनेक विद्यार्थी पीएच.डी.चे शिक्षण अर्ध्यावर सोडत आहेत. त्यामुळे आदिवासी समाज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला जाण्याची भीती संशोधक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात सध्या बार्टी, सारथी आणि महाज्योती यासारख्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून राज्य शासन त्या-त्या समुदायातील संशोधक विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात पीएच.डी. फेलोशिप देऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक पाठबळ पुरविते. त्याच धर्तीवर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात टीआरटीआयने आदिवासी पीएच.डी. संशोधकांना फेलोशिप योजना सुरू करण्याची मागणी राज्यातील विविध विद्यार्थी आणि सामाजिक संघटना मागील दोन वर्षांपासून करत आहेत. दरम्यान, फेलोशिप योजनेची जाहिरात तत्काळ प्रसिद्ध न झाल्यास हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून नागपूरमध्ये बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे जोतिबा हुरदुखे, संतोष तायवाडे, अ‍ॅड. गणेश तोरकड, रामदास वागतकर यांनी दिली.

फेलोशिप हा महत्त्वाचा आधार…
आदिवासी समाज विकासासह उच्च शिक्षणापासून अद्यापही कोसो दूर आहे. या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उच्च शिक्षण महत्त्वाचे आहे. उच्च शिक्षण घेताना सातत्याने भेडसावणारी आर्थिक अडचण ही फेलोशिप योजनेच्या माध्यमातून दूर करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : राज्यातील फेलोशिपपासून वंचित आदिवासी संशोधक विद्यार्थी नागपूरला धडकणार appeared first on पुढारी.