नाशिक विभागीय शिक्षण मंडळात ‘प्रभारी राज’

शिक्षण www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या नाशिक विभागात ‘प्रभारी राज’ बघावयास मिळत आहे. विभागीय अध्यक्षांसह सचिवपदी पूर्णवेळ अधिकारी नसल्याने दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेच्या नियोजनावर विपरित परिणाम होत आहे. तर प्रलंबित फायलींवरही धोरणात्मक निर्णय होत नसल्याने त्यांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे.

नाशिक विभागीय मंडळाचे सचिव राजेंद्र अहिरे यांची पुणे येथे बदली झाल्यानंतर काही दिवस सचिवपद रिक्त होते. दहावी-बारावीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सचिवपदाचा अतिरिक्त भार आदिवासी विकास विभागाच्या सुनीता शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांनी इयत्ता बारावीच्या निकालाच्या दिवशी पदभार स्वीकारत कामकाजाला प्रारंभ केला. दोन्ही पदांना न्याय देण्यासाठी शिंदे यांच्याकडून कसोशीने प्रयत्न केले जात असला, तरी विभागीय मंडळाचे कामकाज अत्यंत संथगतीने सुरू आहे. दरम्यान, गेल्या दीड वर्षापासून नाशिक विभागीय मंडळाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. तत्कालीन कृष्णकुमार पाटील यांची पुणे येथील बालभारतीच्या संचालकपदी बदली झाल्यानंतर कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष नितीन उपासनी यांना नाशिकची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दोन्ही मंडळांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी संभाळताना उपासनी यांची दमछाक होत आहे. उपासनी यांचा निम्मा वेळ मुंबईत जातो. नाशिकला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्याने सर्व कामांचा भार त्यांच्याकडे आहे.

हेही वाचा:

The post नाशिक विभागीय शिक्षण मंडळात 'प्रभारी राज' appeared first on पुढारी.