नाशिक : शवविच्छेदनासाठी कर्मचारीच नसल्याने मृतदेहांची हेळसांड

सिन्नर ग्रामीण रुग्णालय www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर शहरातील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याने दु:खद प्रसंगातही नातेवाईक आणि मृतदेहाचीही हेळसांड होत आहे.

असाच खेदजनक तितकाच संताप निर्माण करणारा प्रसंग मंगळवारी (दि.25) घडला होता. सरदवाडी रस्त्यालगतच्या संजीवनी नगर भागारतील अशोक कारभारी पाटोळे यांचे हृदयविकाराने निधन झाले. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला गेला. मात्र, तिथे नातेवाइकांना ताटकळत रहावे लागले. त्याचे कारण म्हणजे शवविच्छेदनासाठी कर्मचारीच उपलब्ध नव्हता. ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चेतन ठोंबरे यांना विचारणा केली असता त्यांनी आमचेकडे पीएमसाठी माणूस उपलब्ध नाही असे आम्ही वरिष्ठांना लेखी कळवले आहे व वरिष्ठ अधिकारी 15 दिवस सुटीवर असल्याने आम्ही काही करू शकत नाही, असे उडवाउडवीचे उत्तर मृताच्या नातेवाइकांना दिले. त्यामुळे आता करायचे काय? असा प्रश्न नातेवाइकांसमोर उभा ठाकला. माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क करून ही बाब निदर्शनास आणली असता त्यांनीही तीच रि ओढत पर्यायी मार्ग शोधून कळवतो असे सांगितले. एखाद्या कुटुंबातला माणूस मृत्युमुखी पडतो, तेव्हा संबंधित कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतो. अशा प्रसंगातअडचण येता कामा नये, असे माजी नगरसेवक पावसे यांनी डॉ. ठोंबरे यांना सुनावले. दरम्यान, असे प्रकार वारंवार घडू नयेत यासाठी आरोग्य विभागाने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

नगरपालिका दवाखाना बंद झाल्याने शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाअंतर्गत होते. मात्र, यापूर्वी नगरपालिकेचा पूर्णवेळ कर्मचारी हे काम करत असे. त्याला ग्रामीण रुग्णालयाकडून मानधन देणे शक्य नसल्याचे वरिष्ठांचे म्हणणे आहे. शवविच्छेदनाचे काम अवघड आहे. त्यामुळे या कामासाठी कोणीही तयार होत नाही. लवकरच तोडगा निघेल. – डॉ. चेतन ठोंबरे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय सिन्नर.

मानधन मिळत नाही; कर्मचार्‍याची व्यथा…
पावसे यांनी यापूर्वी शवविच्छेदन कामातील मदतनीस जमील शेख यांच्याकडे विचारणा केली. त्यावर त्यांनी मागील 180 मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर अद्याप त्याचे मानधन मिळाले नाही. काम केल्याचा मोबदला मिळत नाही म्हणून मी कामावर येत नाही, अशी माहिती दिली. त्यानंतर पावसे यांनी जमील यांना विनंती करून 2 ते 3 तासांनी शवविच्छेदन करून घेतले.

हेही वाचा:

The post नाशिक : शवविच्छेदनासाठी कर्मचारीच नसल्याने मृतदेहांची हेळसांड appeared first on पुढारी.